‘तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात : अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 18:35 IST2025-01-06T18:33:53+5:302025-01-06T18:35:40+5:30
‘तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, अशा शब्दात पवार यांनी नाराजी व्यक्त करीत संबंधितांना सुनावले.

‘तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात : अजित पवार
बारामती : बारामती शहर परिसरात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असताना काही कार्यकर्ते यांनी काही कामं झाली नसल्याची तक्रार केली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार काही क्षण संतप्त झाल्याचे पहावयास मिळाले. ‘तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, अशा शब्दात पवार यांनी नाराजी व्यक्त करीत संबंधितांना सुनावले.
बारामती येथे आयोजित कार्यक्रमात पवार यांचे भाषण सुरू असतानाच विकासकामे, रस्ते आदींबाबत पवारांची चर्चा सुरू होती. याचवेळी भाषण सुरू असतानाच उपमुख्यमंत्री यांंना काही जणांनी निवेदन दिले. ती निवेदन वाचत अधिकाऱ्यांना पवार यांनी याबाबत सूचना देत संबंधित कामांमध्ये लक्ष देण्यास सांगत होते. यावेळी समोर उपस्थितांमध्ये असणाऱ्या एकाने बरेच महिने झाले काम झाले नाही, असे पवार यांच्या निदर्शनास आणले. त्यानंतर दुसऱ्याही कार्यकर्त्याने तोच विषय पुन्हा मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपमुख्यमंत्री पवार काहीसे संतप्त झाले. मात्र, यावेळी त्यांनी तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, असे सुनावले. यावेेळी काही क्षण शांतता पसरली.
यावेळी कार्यक्रमात खराडवाडी या गावातील काही जण पवार यांच्या नजरेस पडले. त्यावर तेथील नागरिकांनी निवडणुकीत आपल्याला फसविल्याचा उल्लेख अजित पवार यांनी खराडेवाडीतील काहीजण समोर दिसताच त्यांची नावे घेऊन केला. पण पुन्हा ती नाराजी सावरत त्यांनी आपले शब्द आवरले आणि जाऊ द्या, मला माणूस दिसला की आठवतं, असं म्हणत ताटात पडले काय आणि वाटीत पडले काय, असे ते म्हणाले.
काही काळानंतर सगळ्याचा विसर पडेल, असे देखील पवार यांनी यावेळी नमूद केले. पाच वर्षांत अशी कामे करायची की, कुणाच्याही टर्ममध्ये एवढी कामे झाली नाहीत. अशी कामे आपण केली पाहिजेत. आपल्याला करायची आहेत, असे यावेळी पवार म्हणाले. तसेच काही जण कामे घेऊन दुसऱ्याला विकतात, असले प्रकार चालू देणार नाही. स्वत: कामे करणे शक्य असणाऱ्यांनीच कामे घ्यावीत, ती देखील दर्जेदार करावीत, अशा कानपिचक्या देखील टक्केवारीवर इतरांना काम देणाऱ्या ठेकेदारांना पवार यांनी दिल्या.