जंगलात बॉम्बस्फोट करण्याचे प्रशिक्षण; पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांकडून खळबळजनक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 13:30 IST2023-07-27T13:30:06+5:302023-07-27T13:30:15+5:30
दोन दहशवाद्यांना आश्रय देणाऱ्या तसेच आर्थिक मदत करणाऱ्या एका व्यक्तीलाही अटक

जंगलात बॉम्बस्फोट करण्याचे प्रशिक्षण; पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांकडून खळबळजनक माहिती समोर
किरण शिंदे
पुणे : पुण्यात अटक केलेले दहशतवादी प्रशिक्षित असून, या प्रकरणाचा तपास प्रगतिपथावर आहे, त्यांच्याकडून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागत आहेत. ज्या जंगलात दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट करण्याचे प्रशिक्षण आणि चाचणी केली होती. त्या ठिकाणीं वापरलेले साहित्य पोलिसांनी केले आहेत. जंगलात राहत असलेले टेंट ए टी एस ने जप्त केले आहे. हम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी असे या दोघा दहशतवाद्यांची नावे आहेत
पुणे, सातारा, कोल्हापूर अशा जिल्ह्यातील जंगलांमध्ये हे दोघेही जण बॉम्बचे प्रशिक्षण घेत होते. या दोघांनाही आश्रय देणाऱ्या तसेच आर्थिक मदत करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आणि ठिकाण अद्याप समजू शकलेले नाही. 18 जुलै रोजी पुण्यातील कोथरूड भागात या दोघांना पोलिसांनी पकडलं होतं.
खान आणि साकी दोघे मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी असून रतलाम मॉडेलशी ते संबंधित आहेत. ते गेली दीड वर्षापासून पुण्याच्या कोंढवा परिसरात वास्तव्याला होते. मात्र, त्याबाबत कोणतीही माहिती पोलिस किंवा तपास यंत्रणांच्या हाती नव्हती. या प्रकरणात दोघांशिवाय अन्य कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. तसेच, शहरात लगेचच काही घातपात घडवण्याचा त्यांचा कट असल्याबाबतची कोणतीही माहिती तपास यंत्रणांना मिळालेली नाही. साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. तसेच, या दोघांना हाताळणाऱ्या सूत्रधारांबाबत (हँडलर्स) महत्त्वपूर्ण माहिती तपासात मिळाली आहे. येत्या दोन दिवसांत महत्त्वाचे धागेदोरे मिळतील, असे पोलिस महासंचालक दाते यांनी सांगितले. दोघांविरुद्ध विघातक कृत्ये घडवल्याचे कलम गुन्ह्यात लावण्यात आले आहे. काही जणांची चौकशी सुरू आहे.