लोणावळ्यात जय्यत तयारी, मनोज जरांगेंच्या सभेसाठी १३०, तर वाहनतळासाठी १५० एकर मैदान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 08:22 PM2024-01-24T20:22:29+5:302024-01-24T20:25:13+5:30

जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती....

Jayyat preparations in Lonavala, 130 acres for Manoj Jarang's meeting, 150 acres for parking | लोणावळ्यात जय्यत तयारी, मनोज जरांगेंच्या सभेसाठी १३०, तर वाहनतळासाठी १५० एकर मैदान

लोणावळ्यात जय्यत तयारी, मनोज जरांगेंच्या सभेसाठी १३०, तर वाहनतळासाठी १५० एकर मैदान

लोणावळा (पुणे) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांची पदयात्रा मुंबईकडे जात आहे. चौथ्या दिवशी त्यांचा मुक्काम लोणावळा शहराजवळील वाकसई चाळ येथे होता. तेथेच बुधवारी सभा झाली. सभेसाठी १३० एकरचे, तर वाहनतळासाठी शिलाटणे गावाजवळ १५० एकरचे मैदान तयार करण्यात आले. रस्त्यालगतच्या हॉटेलचे पार्किंगही उपलब्ध करून देण्यात आल्या. जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती.

एवढा लांबचा टप्पा पायी चालून आल्यानंतर आरोग्याची समस्या निर्माण झाल्यास जागोजागी आरोग्य कक्ष तयार करण्यात आले. लोणावळा भागामध्ये थंडी असल्याने गुरुवारी सकाळी आंघोळीसाठी गरम पाण्याची व स्नानाची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. फिरती शौचालयेही मोठ्या प्रमाणात आहेत. सभास्थळी येणाऱ्या नागरिकांसाठी सायंकाळी पाच ते दुसऱ्या दिवशी पदयात्रा जाईपर्यंत चहाची व्यवस्था आहे.

मागील आठ ते दहा दिवसांपासून सकल मराठा समाजाच्या वतीने परिसराची स्वच्छता करण्यात आली. वीस ते पंचवीस जेसीबी, पिण्याच्या पाण्याचे टँकर, रोलर या सुविधा स्थानिक सकल मराठा समाज बांधवांनी पुरवल्या. सभेच्या मैदानावर प्रकाश व्यवस्था करण्यात आली. मनोज जरांगे-पाटील यांचे भाषण सर्वांना नीट ऐकता यावे यासाठी सर्वत्र ध्वनिवर्धकही लावण्यात आल्याचे दिसून आले.

सभेस, मुक्कामास येणाऱ्याला सहज मिळाली माहिती

सभेच्या परिसरामध्ये येणाऱ्या सकल मराठा समाजाला व स्थानिकांना कोणत्या ठिकाणी कोणती व्यवस्था करण्यात आली आहे, याची माहिती सहज समजावी याकरिता जागेचा आराखडा तयार करून तो मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध करण्यात आला.

घराघरांतून प्रत्येकी २५ चपात्या, चटणी

सर्व सुविधा देण्यासाठी प्रत्येकी शंभर स्वयंसेवकांचे ग्रुप तयार करण्यात आले. त्यांच्याकडे मैदानावरील वेगवेगळ्या विभागाची कामे सोपवण्यात आली. लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण व मावळ तालुक्यातील आंदर मावळ, पवन मावळ, नाणे मावळ, कामशेत, वडगाव, तळेगाव या भागामधून घरोघरी प्रत्येकी २५ चपात्या व चटणी बनवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांनी अन्नपदार्थ तयार केले. त्या-त्या गावांमधील स्वयंसेवकांनी ते सर्व गोळा करत सभेच्या ठिकाणी जमा केले. बुंदी, पिण्याचे पाणी, लाडू, फरसाण, सुकामेवा यासारखे पदार्थ उपलब्ध करून दिले आहेत.

मोफत टँकर

लोणावळा शहर व ग्रामीण भागातील टँकर चालकांनी येणाऱ्या सकल मराठा समाज बांधवांच्या पिण्याची पाण्याची व्यवस्था व्हावी याकरिता मोफत टँकर उपलब्ध करून दिले. लोणावळा नगर परिषदेच्या टँकर स्टँडवर हे सर्व टँकर मोफत भरून दिले जात आहेत. परिसरातील मराठा समाजातील डॉक्टर्सही मोफत सेवा देण्यासाठी उपस्थित राहिले.

Web Title: Jayyat preparations in Lonavala, 130 acres for Manoj Jarang's meeting, 150 acres for parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.