पुणे: ठाकरे बंधू एकत्र येण्याची चिन्हे सद्यस्थितीत दिसू लागली आहेत. उद्धव ठाकरे गटाकडून या युतीला सकारात्मक प्रतिसाद दर्शवण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातील इतर पक्षाच्या नेत्यांनीही याबाबत आनंद व्यक्त केला आहे. त्यानंतर आता ठाकरे बंधूंच्या युतीबाबत कॉग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पुण्यात भाष्य केले आहे. एकत्र येणे न येणे तो त्यांचा कौटुंबिक विषय आहे. त्यात काँग्रेस कशाकरता पडेल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पक्षाने प्रदेश कार्यकारिणीसाठी खडकवासला इथे आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिराचा समारोप मंगळवारी चेन्नीथला यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. ठाकरे बंधु यांच्या युतीबाबत काँग्रेसची भूमिका काय आहे? असे विचारले असता चेन्नीथला म्हणाले, एकत्र येणे न येणे तो त्यांचा कौटुंबिक विषय आहे. त्यात काँग्रेस कशाकरता पडेल? राज व उद्धव यांची बोलणी सुरू आहेत. ती काय आहेत याची महाविकास आघाडीतील अन्य पक्षांना माहिती नाही. महाविकास आघाडीबरोबर यासंदर्भात काहीही बोलणी झालेली नाही. महाविकास आघाडीत ते आले तर काय वगैरे प्रश्न जरतरचे आहेत. काँग्रेस त्यावेळी याचा निर्णय घेईल.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर पुरावे देत आरोप केले आहेत. त्याचे उत्तर देणारे देवेंद्र फडणवीस कोण आहेत? मुख्यमंत्री कि निवडणूक आयुक्त अशी टीका त्यांनी यावेळी केली. लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण करण्याचे काम सुरू आहे. काँग्रेस त्याचा प्रतिकार करेल. सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. फ्रि फेअर निवडणूक भाजपच्या कारकिर्दीत अशक्य दिसते आहे. लोकसभेत आम्ही विजयी होतो व.फक्त ५ महिन्यात विधानसभेला पराभूत हे मतचोरीशिवाय होणार नाही. बिहारमध्ये तेच होईल. बंगळुरातही तेच होणार आहे. भाजपच्या सरकारच्या सर्व गोष्टी आमचे काँग्रेस कार्यकर्ते जनतेपर्यंत घेऊन जातील असे चेन्नीथला यांनी सांगितले.