पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात नातेसंबंधांचा विश्वास तुटवणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका दाजीने आपल्या मेव्हण्याच्या घरीच चोरी करत सुमारे २ लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोंढवापोलिसांनी दाजीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीचा संपूर्ण ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
३६ वर्षीय फिर्यादीने कोंढवा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ७ जुलै रोजी सकाळच्या सुमारास ते कामासाठी बाहेर गेले होते. त्याच वेळी त्यांच्या घरातील इतर सदस्यही त्यांच्या बहिणीच्या घरी गेले होते. संध्याकाळी साडेसहा वाजता सर्वजण घरी परतले असता त्यांच्या लक्षात आले की घराचे कुलूप तुटले असून घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून २.४६ लाख रुपयांचा ऐवज गायब आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. घरात कोणत्याही जबरदस्तीचा किंवा घातपाताचा प्रकार आढळून आला नाही. यावरून घराची अचूक माहिती असलेल्यानेच चोरी केली असावी, असा संशय पोलिसांनी घेतला.
तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, एक संशयित व्यक्ती अश्रफनगर परिसरात थांबलेला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. त्याचे नाव रोहेल शेख असून, तो फिर्यादीच्या बहिणीचा पती आहे. रोहेल हा कुटुंबीयांच्या घरात वारंवार ये-जा करत असे, त्यामुळे त्याला घरातील वस्तूंची आणि चाव्यांची चांगली माहिती होती. पोलिसी चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. घरात कोणी नसल्याची खात्री करून, कळत-नकळत घेतलेल्या चाव्यांद्वारे त्याने कुलूप उघडून चोरी केली होती. अटक केल्यानंतर रोहेलने पोलिसांना २ लाख ४६ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम परत दिली. पोलिसांनी संपूर्ण मालमत्ता हस्तगत केली असून आरोपीवर गुन्हा नोंदवून न्यायालयात हजर करण्यात आले आहे.