पुणे : मित्राच्या वाढदिवसानिमित्त सर्व जण एकत्र जमून केक कापला जातो़ आता तर निम्मा केक तोंडाला फासण्याची नवीन फॅशनच आली आहे. पण भर रस्त्यावर कोयत्याने केक कापण्याचा प्रकार काही जणांना चांगलाच महागात पडला आहे. कोंढवापोलिसांनी अशा ५ जणांवर गुन्हा दाखल करुन त्यातील दोघांना अटक केली आहे.अक्षय अमरुषी शेलार (वय २२, रा. सिद्धार्थनगर, कोंढवा) आणि कृणाल प्रताप लोणकर (वय १९, रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर सोनु भिसे, रोहन कसबे, गणेश चराटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक नितेश टपके यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनु भिसे याचा वाढदिवस असल्याने त्याच्या मित्रांनी केक आणला होता. ते सर्व जण शनिवारी सायंकाळी एनआयबीएम रोडवील लॉ वेंटेना मॉलसमोर रस्त्यावर जमले होते. सोनुचा वाढदिवसानिमित्त त्यांनी केक आणला होता. हा केक चाकूने कापण्याऐवजी त्यांनी तो कोयत्याने कापला. हा सर्व प्रकार रस्त्यावरुन जाणारे येणारे पाहत होते. या केक कापण्याचे शुटींगही काहींनी केले.याबाबत लोकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन माहिती दिली.त्याबरोबर पोलीस मार्शल व कोंढवा तपास पथकातील कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी दोघांना ताब्यात घेतले. इतर तिघे पळून गेले़ पोलीस उपनिरीक्षक शिंदे अधिक तपास करीत आहेत.
'सोनू'च्या वाढदिवसाला भर रस्त्यावर कोयत्याने केक कापणे पडले महागात;कोंढव्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 14:15 IST