बांधकामाला सुमारे ९० ते ९५ वर्षे झाली; चाकण तळेगाव महामार्गावरील महाळुंगे येथील पूल बनला धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 16:17 IST2025-06-16T16:16:44+5:302025-06-16T16:17:37+5:30

प्रशासनाने पुलाकडे दुर्लक्ष केले असून त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट केव्हा झाले? हे कुणी अधिकारी ठामपणे सांगत नाही

It took about 90 to 95 years to build; The bridge at Mahalunge on the Chakan Talegaon highway has become dangerous. | बांधकामाला सुमारे ९० ते ९५ वर्षे झाली; चाकण तळेगाव महामार्गावरील महाळुंगे येथील पूल बनला धोकादायक

बांधकामाला सुमारे ९० ते ९५ वर्षे झाली; चाकण तळेगाव महामार्गावरील महाळुंगे येथील पूल बनला धोकादायक

चंद्रकांत मांडेकर 

चाकण: चाकण - तळेगाव महामार्गावरील महाळुंगे (ता.खेड) येथील दगडी पुलांच्या बांधकामाला सुमारे ९० ते ९५ वर्षे झाली आहेत. सध्या दुरवस्थेमुळे हा पूल अत्यंत धोकादायक बनला आहे. पुलाच्या बांधकामात झाडेझुडुपे वाढलेली आहेत.तसेच दोन्ही बाजूंना मोठे खड्डे पडले आहेत. पुलावरून रोज हजारोंच्या संख्येने लहान मोठ्या वाहनांची येजा सुरू आहे.या पुलाच्या दुरुस्तीची मागणी केली जात आहे.

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील पूल कोसळून झालेल्या जीवघेण्या घटनेनंतर महाळुंगे येथील धोकादायक पुलाचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वेक्षण करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केव्हा झाले? हे कुणी अधिकारी ठामपणे सांगत नाही. पुलाच्या क्षमतेपेक्षा या पुलावरून एका वेळेस शेकडो वजनांचे अवजड कंटेनर ये-जा करीत आहेत. त्यामुळे या पुलाला कधीही धोका उ‌द्भवू शकतो, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

चाकण, तळेगाव,रांजणगाव येथे औद्योगिक वसाहत झाल्यानंतर या पुलावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. औद्योगिक वसाहत असल्याने अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. चाकण-तळेगाव मार्गाचे काही वर्षांपूर्वी बीओटी तत्त्वावर नूतनीकरण करण्यात आले होते. त्यावेळी या पुलाच्या बांधकामाला धक्का न लावता तात्पुरती डागडुजीचे काम करण्यात आले होते.सध्या या पुलाचे काही ठिकाणी बांधकाम पडले आहे,तसेच काही ठिकाणी तडे गेले आहेत. या पुलाच्या बांधकामावर झाडेझुडुपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत.

 ओढ्यावरील या पुलाने शतक पार केले आहे. वाढलेल्या वाहनांच्या संख्येने पुलाला भार झेपेनासा झाला आहे. औद्योगिक वसाहत वाढल्याने महामार्गावरील वर्दळ वाढली परंतु पूल आहे तेवढाच आहे. नव्याने पूल बांधण्याची शासनाला गरज वाटत नाही. किमान अवजड वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्याची आवश्यक आहे. ओड्यावर बांधलेला हा पूल खूप जुना झाला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना मोठे खड्डे पडले आहेत. झाडेझुडुपे वाढल्याने हे खड्डे वाहनचालकांना दिसत नाहीत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: It took about 90 to 95 years to build; The bridge at Mahalunge on the Chakan Talegaon highway has become dangerous.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.