Pune Rain: ऐन उन्हाळ्यातच बरसला; पुणे शहरात सोसाट्याचा वारा अन् विजांच्या कडकडाटासह पाऊस

By नितीन चौधरी | Published: March 15, 2023 09:33 PM2023-03-15T21:33:30+5:302023-03-15T21:34:18+5:30

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील ३ दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता

It rained only in summer Gusty wind and rain with lightning in Pune city | Pune Rain: ऐन उन्हाळ्यातच बरसला; पुणे शहरात सोसाट्याचा वारा अन् विजांच्या कडकडाटासह पाऊस

छायाचित्र - सुशील राठोड

googlenewsNext

पुणे : दिवसभर कधी ढगाळ वातावरण, तर कधी ऊन हाेते, अशा विषम वातावरणामुळे शहरात रात्री सोसाट्याचा वारा व विजांच्या कडकडाटासह काही काळ मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे घरी परतणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस अर्थात शनिवारपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवारी रात्री शहरात एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, द्रोणीय रेषेमुळे अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, दिवसाचे कमाल तापमान त्यासाेबत बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या आर्द्रतेमुळे स्थानिक परिस्थितीत जास्त उंचीचे ढग (क्युमिलोनिंबस ढग) तयार होत आहेत. बुधवारीही पुणे शहराच्या वरच्या वातावरणातही असे ढग तयार झाले. त्यामुळे सोसाट्याचा वाऱ्यांमुळे मेघगर्जनेसह पावसाला रात्री पावसाला सुरुवात झाली. काही काळ त्याचा जोर होता.

शहराच्या हडपसर, कोथरूड, सिंहगड रस्ता, मध्यवर्ती पेठा, कॅम्प परिसर, सातारा रस्ता या भागांतही पावसाने हजेरी लावली. कोथरूड येथील पौंड रोड, जयभवानीनगर, सुतारदरा, जिजाऊनगर, गुजरात कॉलनी, आनंदनगर, भुसारी कॉलनी भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे सिंहगड रस्ता परिसरात काही काळ वीजपुरवठाही खंडित झाला होता.

पुढील दोन दिवस पाऊस 

रात्री साडेआठ वाजता केलेल्या नोंदीनुसार शिवाजीनगर येथे १, हडपसर येथे ०.५ व चिंचवड येथे २.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार गुरुवारीही मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता असून शुक्रवारी व शनिवारीही हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.

Web Title: It rained only in summer Gusty wind and rain with lightning in Pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.