आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 12:10 IST2025-07-26T12:09:05+5:302025-07-26T12:10:08+5:30
मे महिन्यात झालेल्या पावसाळ्यात आयटी पार्क वॉटर पार्क झाले होते. त्यामुळे आयटीनगरी हिंजवडीतील समस्या ऐरणीवर आल्या आहेत. वाहतूक कोंडी, नागरी समस्या सोडवण्यासाठी अभियंत्यांनी आंदोलने केली.

आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
पिंपरी : राजीव गांधी आयटी पार्क हिंजवडी येथील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरी समस्यांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (शनिवार, २६ जुलै २०२५) सकाळी सहा वाजता पुन्हा एकदा पाहणी केली. यावेळी त्यांनी हिंजवडीच्या सरपंचांना खडेबोल सुनावले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहणी दरम्यान, अजित पवार कारमध्ये बसत असताना हिंजवडीचे सरपंच त्यांच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते. यावर अजित पवार म्हणाले, "तुम्हाला काय सांगायचे ते सांगा, मी ऐकून घेतो. मला काय करायचे ते मी करतो. पण आपले वाटोळे झाले आहे. हिंजवडीचे आयटी पार्क पुणे, महाराष्ट्रातून हैदराबाद, बंगळुरूला चालले आहे. मी कशाला सकाळी सहा वाजता येऊन पाहणी करतोय? मला कळत नाही का? माझीही लोक आहेत. पण ते केल्याशिवाय गत्यंतर नाही."
हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी आणि नागरी समस्यांमुळे अनेक कंपन्या अन्य शहरांकडे स्थलांतरित होत असल्याची चिंता अजित पवारांनी व्यक्त केली. त्यांच्या या स्पष्टवक्तेपणामुळे स्थानिक प्रशासन आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. येत्या काळात या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कोणती पावले उचलली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तत्पूर्वी, मे महिन्यात झालेल्या पावसाळ्यात आयटी पार्क वॉटर पार्क झाले होते. त्यामुळे आयटीनगरी हिंजवडीतील समस्या ऐरणीवर आल्या आहेत. वाहतूक कोंडी, नागरी समस्या सोडवण्यासाठी अभियंत्यांनी आंदोलने केली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन आठवड्यापूर्वी हिंजवडीतील समस्यांची पाहणी केली होती. दोन आठवड्यापूर्वी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी सुरू झाली आहेत का, त्यानुसार विकास कामांना सुरुवात केली आहे का, याची शनिवारी अजित पवार यांनी पाहणी केली. वाहतूक कोंडी, रस्ते या नागरी समस्या सोडविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यावेळी उपस्थित होते.