आयटी पार्कवर शिक्कामोर्तब...! दीड हजार एकरावर होणार पुरंदर आयटी पार्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 16:38 IST2026-03-19T16:38:33+5:302026-03-19T16:38:53+5:30
- विधानसभेत लक्षवेधी प्रस्तावावर उद्योगमंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या घोषणा

आयटी पार्कवर शिक्कामोर्तब...! दीड हजार एकरावर होणार पुरंदर आयटी पार्क
गराडे : पुण्यातील आयटी कंपन्यांचे अन्य राज्यांमध्ये स्थलांतर थांबवण्यासाठी पुरंदर तालुक्यात आयटी पार्कसाठी जागा उपलब्ध करून देण्याची तयारी आमदार विजय शिवतारे यांनी व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने २७ फेब्रुवारी २०२६ रोजी महसूल विभागाकडे ५७२ हेक्टर म्हणजेच जवळपास दीड हजार एकर जागेच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिली. आमदार शिवतारे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नावर ते बोलत होते.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. शिवतारे यांनी प्रस्तावित पुरंदर आयटी पार्कबाबत २४ जुलै २०२४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी तत्त्वतः मान्यता दिली होती. पुढे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपलब्ध जागेचा अहवाल मागवला होता. त्या संदर्भात पुढील कार्यवाही तातडीने करण्याची मागणी शिवतारे यांनी केली होती. त्यावर बोलताना उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक म्हणाले की, पुण्यातील कंपन्यांच्या वाहतूक कोंडी आणि अन्य समस्येमुळे स्थलांतर होणे चिंताजनक आहे, त्यामुळे शिवतारे यांची मागणी योग्य आहे. पुरंदर आयटी पार्कसाठी ३ एप्रिल २०२५ रोजी उद्योगमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार १५ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रादेशिक अधिकारी कार्यालयाकडून उद्योग विभागाला प्रस्ताव प्राप्त झाला. नुकत्याच २७ फेब्रुवारी रोजी महसूल विभागाकडे या जागेची मागणी करण्यात आल्याचेही नाईक यांनी सांगितले.
या प्रस्तावावर जागा हस्तांतरणाची कार्यवाही तातडीने करावी आणि विधिमंडळात या आयटी पार्कची घोषणा करावी, अशी मागणी शिवतारे यांनी केली. त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, लवकरच याबाबतचा अंतिम प्रस्ताव कॅबिनेटसमोर आणला जाईल. पुरंदर आयटी पार्कची मी आजच घोषणा करीत आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यापूर्वी महसूल विभागाच्या जमिनीवर असे उद्योग उभारणीचे काम केलेले आहे. त्यांच्याशी चर्चा करून महसूल विभागाची जागा हस्तांतरण प्रक्रिया जलद करण्याबाबत सरकार सुधारणा करणार असल्याचेही सामंत म्हणाले.
आयटी पार्कवर शिक्कामोर्तब - शिवतारे
या घोषणेनंतर आमदार विजय शिवतारे यांनी आनंद व्यक्त केला. पुरंदर तालुक्यात आयटी पार्कवर शिक्कामोर्तब झाले असून लवकरात लवकर हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी मी पुढील काळातही पाठपुरावा करत राहणार आहे.
प्रस्तावित गाव व क्षेत्रफळाचा तपशील -
चांबळी - १८५.६८ हेक्टर
दिवे - १८८.८३ हेक्टर
कोडीत बु. - १२४.१ हेक्टर
कोडीत खु. - ७३.९३ हेक्टर
एकूण - ५७२.५४ हेक्टर (१४८४ एकर)