Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण देणे सरकारची जबाबदारी, मग न्यायदेवतेची मध्यस्थी कशाला? जरांगेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 18:23 IST2025-08-28T18:22:44+5:302025-08-28T18:23:40+5:30
‘आम्ही आरक्षण मिळवणारच, आता थांबणार नाही,’ असे ठणकावून सांगत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण देणे सरकारची जबाबदारी, मग न्यायदेवतेची मध्यस्थी कशाला? जरांगेंचा सवाल
जुन्नर : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या आझाद मैदानाकडे कूच करणाऱ्या मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज किल्ले शिवनेरी येथे भेट देऊन आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत, ‘मराठा आरक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे. यासाठी न्यायदेवतेची मध्यस्थी कशाला,’ असा सवाल उपस्थित केला. शिवनेरीच्या मातीला कपाळी लावत त्यांनी आरक्षणासाठी बलिदानाची तयारी दर्शविली.
सकाळी जुन्नर येथे आगमन झालेल्या जरांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी आंदोलकांसह जयघोष केला. ट्रक, टेम्पो, जीप आणि दुचाकींमधून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक शिवनेरीच्या पायथ्यापासून शिवाई मंदिरापर्यंत पारंपरिक वाद्यांच्या गजरात सहभागी झाले. जरांगे यांनी शिवाई देवीची आरती करून शिवजन्मस्थळी नतमस्तक होत, ‘ही लढाई आता आरपार असेल,’ असा निर्धार व्यक्त केला.
जरांगे म्हणाले, ‘मराठा समाजाच्या लेकरांच्या वेदनांना न्याय देण्यासाठी हे आंदोलन आहे. गरीब मराठ्यांचा अपमान करू नका सत्ता मराठ्यांनी दिली; पण सरकार मराठ्यांवरच उलटले.’ रायगड आणि शिवनेरीसारखी प्रेरणास्थळे यश आणि प्रेरणा देतात, असे सांगत त्यांनी सरकारला मराठा विरोधी भूमिका सोडण्याचे आवाहन केले. ‘आम्ही आरक्षण मिळवणारच, आता थांबणार नाही,’ असे ठणकावून सांगताना त्यांनी सरकारला इशारा दिला, ‘छत्रपतींच्या विचारांवर चालणारे सरकार मराठ्यांवर गोळ्या घालणार का?’
आंदोलनात मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, आंतरवालीचे सरपंच पांडुरंग तारख आणि मारत आंदोलक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत आंदोलकांनी आरक्षणाची मागणी तीव्र केली.
शिष्टमंडळ भेटीला तयार
सरकारचे शिष्टमंडळ भेटण्यासाठी येणार असल्याच्या प्रश्नावर जरांगे म्हणाले, ‘आम्ही चर्चेला तयार आहोत. आमचे आंदोलन कायद्याच्या चौकटीत आहे. पण सरकारने आमच्या आंदोलनाला हात लावला, तर मराठा समाज राज्यभर पेटून उठेल.’ गणेशोत्सवात अडथळ्याच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी प्रतिप्रश्न केला, ‘आमच्या हातात बंदुका आहेत का? अंतरवालीत लाठीचार्ज करताना गणपती बसले नव्हते का? आम्ही गोळ्या झेलायला तयार आहोत, पण हटणार नाही.’