MNS Vasant More: वसंत मोरेंची जाहीर नाराजी, मनसेचही ठरलं; दोन दिवसांत अधिकृतपणे भूमिका स्पष्ट करणार!
By मुकेश चव्हाण | Updated: December 6, 2022 16:32 IST2022-12-06T16:30:51+5:302022-12-06T16:32:39+5:30
मनसेचे पुण्यातील नेते बाबू वागस्कर यांनी सदर प्रकणावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

MNS Vasant More: वसंत मोरेंची जाहीर नाराजी, मनसेचही ठरलं; दोन दिवसांत अधिकृतपणे भूमिका स्पष्ट करणार!
मनसेचे नेते वसंत मोरे (MNS Vasant More) यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात येण्याची ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील एका लग्नात अजित पवारांनी वसंत मोरेंना ही ऑफर दिली आहे. अजित पवारांच्या या ऑफरनंतर वसंत मोरे लवकरच मनसे पक्ष सोडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वसंत मोरेंनी सोमवारी माध्यमांशी बोलताना जाहीर नाराजी बोलावून दाखवली होती. पुणे शहरातील पक्षामधून मला डावलंल जातंय. मला लक्ष्य केलं जातंय. मला पक्षाच्या कुठल्या कार्यक्रमाला बोलावलं जात नाही. तरीसुद्धा मी कार्यक्रमाला जातो. मला स्टेजवर बसवलं जातं, मात्र भाषणासाठी वेळ दिला जात नाही. या सगळ्या गोष्टी मी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना सांगितल्या आहेत, असं वसंत मोरेंनी सांगितलं.
आगामी निवडणुकीत नवीन झेंडा हातात घेणार?; वसंत मोरेंनी स्पष्टच सांगितलं, पक्षनेतृत्वावरही बोलले!
वसंत मोरेंच्या या नाराजीवरुन मनसेकडून आतापर्यंत कोणतीच प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र आता मनसेचे पुण्यातील नेते बाबू वागस्कर यांनी सदर प्रकणावर आपलं मत व्यक्त केलं आहे. वसंत मोरेंनी व्यक्त केलेल्या नाराजीवर पक्ष अधिकृतपणे दोन दिवसात भूमिका स्पष्ट करेल, अशी माहिती बाबू वागस्कर यांनी दिली.
वसंत मोरे सातत्याने पक्षाची बदनामी होईल, अशी वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबतीत दोन दिवसांत विचार केला जाईल, असं मनसेनं ठरवल्याचे सांगण्यात येत आहे. आज पुण्यातील मनसे पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत वसंत मोरे यांनी दांडी मारल्याचे दिसून आले.
'अजित' मार्गावर यावेच लागते भावा'; वसंत मोरेंचा व्हिडिओही शेअर केला, रुपाली पाटलांची पोस्ट चर्चेत
दरम्यान, सध्या मी मनसे पक्षातच आहे. आगामी निवडणुकी जवळ येताय. त्यावेळी वसंत मोरे कुठे असतील, असा प्रश्न वसंत तात्यांना विचारला असता, मी सध्या कुठल्याही वाटेवर नाही. परंतु पक्षनेतृत्व आणि पक्ष याच्यावर मी नाराज नाही. मात्र पुण्यातील जी कार्यकारणी आहे, ती मला वारंवार डावलतेय. माझी कामे आणि सामान्या लोकांमधील असलेली प्रसिद्धी या लोकांना बघवत नाही, असं म्हणत वसंत मोरे यांनी पक्षाला घराचा आहेर दिला. तसेच राज ठाकरेंना वारंवार सांगूनही मला टाळण्यात येतंय. राज ठाकरे काही दिवसांपूर्वी पुण्यात आले होते. त्यावेळी मला वाटलं राज ठाकरे पुण्यातील नेत्यांना काहीतरी बोलतील, मात्र असं काहीच झालं नाही, असं वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच मी मनसेतून गेल्यास पक्षाला फरक पडेल, परंतु इथल्या स्थानिक नेत्यांना आनंद होईल, असा दावा देखील वसंत मोरे यांनी केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"