पुणे : विधानसभा निवडणुकीचा निकाल विरोधकांच्या एकदम जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच ते आता ईव्हीएममध्ये घोटाळा यासह अनेक आरोप करत आहेत. मात्र, त्यांनी ते सिद्ध करून दाखवावेत, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी विरोधकांना दिले. विराेधक रडीचा डाव खेळत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. तर आमचे सरकार येणारच आहे. ५ डिसेंबरला शपथविधी होईल. मंत्रिपदांबाबत आमच्यात कसलीही रस्सीखेच नाही. १३२ जागा भाजपच्याच आहेत तर मुख्यमंत्रीही त्यांचाच होणार हे नक्की असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांची उपोषणस्थळी भेट घेऊन आल्यानंतर अजित पवार यांनी महात्मा फुले वाड्याच्या परिसरात पत्रकारांंशी संवाद साधला. त्यांच्या समवेत वडगाव शेरीचे माजी आमदार सुनील टिंगरे, शहराध्यक्ष दीपक मानकर व पक्षाचे अन्य पदाधिकारी होते.
निवडणूक होती, त्याचा ताण होता, मुख्यमंत्री गावाला विश्रांतीसाठी गेले आहेत. मुख्यमंत्री कोण असावा हे भारतीय जनता पक्षाने ठरवावे, असे आम्ही त्यांना सांगितले आहे. आता निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. कोणाला कोणती पदे द्यायची हा अधिकार राज्याच्या प्रमुखाला असतो. त्यामुळे कोण मंत्री होणार, कोणाला कोणते पद मिळणार, हे मुख्यमंत्रीच सांगतील असेही पवार म्हणाले.
आम्हाला मिळालेले बहुमत इतके आहे की, त्यात कसलाही वाद होण्याचा विषयच नाही. ते मुुख्यमंत्री ठरवलीत, त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री ठरतील, असे आता आमचे ठरले आहे. नावे लवकरच निश्चित होतील. तसाच शपथविधीही होईल. लाडकी बहीण योजनेचे निकष बदलायचे काही कारणच नाही, अजून तर सरकार स्थापन व्हायचे आहे, काहीही टीका करण्यात काहीच अर्थ नाही, असेही पवार म्हणाले.