इस्रो, नासाची सफर नियंत्रित होणार सुकाणू अन् कार्यकारी समितीद्वारे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 15:12 IST2025-05-09T15:10:11+5:302025-05-09T15:12:38+5:30
७५ विद्यार्थ्यांना संधी : जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हा परिषद करणार संपूर्ण खर्च, उन्हाळ्याच्या सुटीतदेखील या विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन तयारी करून घेण्याच्या सूचना

इस्रो, नासाची सफर नियंत्रित होणार सुकाणू अन् कार्यकारी समितीद्वारे
जेजुरी : ग्रामीण भागातील पालकांची बिकट आर्थिक परिस्थिती, तसेच विज्ञान व तंत्रज्ञानाच्या कमी सोयी-सुविधांमुळे प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांमध्ये संशोधक व चिकित्सक वृत्ती निर्माण होऊन विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, संशोधन क्षेत्राकडे मुलांचा कल वाढावा, मुले शास्त्रज्ञ व्हावेत या अनुषंगाने जागतिक स्तरावरील उच्च दर्जाच्या अंतराळ संशोधन करणाऱ्या संस्थांना भेट देऊन तेथील अनुभव, कार्यपद्धती व माहिती घेऊन भविष्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ घडविण्याच्या उद्देशाने इस्रो व नासा या अंतराळ संशोधन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थांना ग्रामीण भागातील ७५ विद्यार्थ्यांना पुणे जिल्हा परिषदेमार्फत शैक्षणिक वर्ष २०२५ -२६ मध्ये जिल्हा नियोजन समिती मार्फत भेट (सहल) घडविण्याचे नियोजन जिल्हा परिषदेने केले आहे.
इस्रो व नासा अंतराळ संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी योग्य व जिज्ञासू विद्यार्थ्यांची निवड व्हावी म्हणून पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील इयत्ता सहावी व इयत्ता सातवीच्या सर्व इच्छुक विद्यार्थ्यांची सामान्य विज्ञान व गणित पाठ्यपुस्तकांमधील अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे. याबाबत सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना उन्हाळ्याच्या सुटीतदेखील या विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन तयारी करून घेण्याबाबतच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
यासाठी तीन चाळणी परीक्षा घेण्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ०५ जुलैला पहिली चाळणी परीक्षा, १९ जुलैला दुसरी चाळणी परीक्षा, तर जुलैच्या शेवटच्या किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तिसरी चाळणी परीक्षा होणार आहे. पहिल्या व दुसऱ्या चाळणी परीक्षेचे स्वरूप पर्यायी उत्तर प्रश्न स्वरुपात, तर तिसरी चाचणी ही आयुका, पुणे येथे विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन अंतिम ७५ विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. पहिल्या चाळणी परीक्षेसाठी आयुका संस्थेने जिल्हा परिषदेला प्रश्नपत्रिका देऊन जिल्हास्तरावर प्रश्नपत्रिकांची छपाई करून परीक्षेच्या एक दिवस अगोदर संबंधित गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तालुकास्तरावर दिल्या जातील. तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक व लिपिकांची या परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करून परीक्षेबाबत गोपनीयतेबाबत सुचविले आहे. उत्तर पत्रिकांची तपासणी स्कॅनिंग मशीनद्वारा जिल्हास्तरावरून करण्यात येणार आहे.
आयुकामार्फत निवड
निवड केलेल्या विद्यार्थ्यांची दुसरी चाळणी परीक्षा तालुकास्तरावर एमकेसीएलच्या केंद्रावर घेण्यात येईल. परीक्षेमधून उच्च गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची १:४ प्रमाणात निवड करण्यात येईल. या विद्यार्थ्यांना आयुका, पुणे येथे संस्थेच्या कॅम्पस भेटीसाठी पाठविले जाईल. चौकस बुद्धी व वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयी निरीक्षण करून व मुलाखतीद्वारे आयुका मार्फत ४:१ या प्रमाणात असे एकूण ७५ विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाईल.
पाच अधिकारी, चार शिक्षकांचाही समावेश
निवड केलेल्या ७५ विद्यार्थ्यांमधून ५० विद्यार्थी, ५ अधिकारी व ४ शिक्षक यांना इस्रो येथे, तर २५ विद्यार्थी, ५ अधिकारी व ४ शिक्षक यांना नासा या अंतराळ संस्थेस भेटीसाठी पाठविले जाणार आहेत. इस्रो व नासा भेटीचा विमान प्रवास, वैद्यकीय विमा, इतर शैक्षणिक स्थळांच्या भेटी, निवासस्थान व जेवण खर्च जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्हा परिषद करणार आहे. जिल्हा सुकाणू व जिल्हा कार्यकारी समितीमार्फत ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे.