स्वारगेट अत्याचार पोलिसांनी पूर्ण दिवस दडपला..! केंद्रीय मंत्र्यांनी कान टोचले पण सुधारणा होईना
By राजू इनामदार | Updated: February 27, 2025 16:08 IST2025-02-27T16:08:13+5:302025-02-27T16:08:58+5:30
शहर सुरक्षित आहे का ? केंद्रीय मंत्र्यांच्या आदेशाचे पुणे पोलिसांना गांभीर्य आहे की नाही

स्वारगेट अत्याचार पोलिसांनी पूर्ण दिवस दडपला..! केंद्रीय मंत्र्यांनी कान टोचले पण सुधारणा होईना
पुणे : गुंड गजा मारणेच्या साथीदारांनी केलेल्या मारहाण प्रकरणात भाष्य करताना केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पोलिसांनी आत्मपरिक्षण करावे असा आदेशवजा सल्ला दिला होता, मात्र हा सल्ला लक्षात न घेता पोलिसांनीस्वारगेट बसस्थानकातील बलात्कारासारखे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे, त्यामुळेच केंद्रीय मंत्र्यांच्या आदेशाचे पोलिसांना काही गांभीर्य आहे की नाही असा प्रश्न यातून विचारला जात आहे.
गजा मारणे याच्या साथीदारांना ज्याला मारहाण केली तो मोहोळ यांचा कार्यकर्ता होता. त्यामुळेच मोहोळ यांनी दिल्लीवरून येताच या प्रकरणाची दखल घेतली. विमानतळावरच पत्रकार परिषद घेत त्यांनी पोलिसांनी या प्रकरणात त्वरीत तपास करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले. त्याचबरोबर रात्री साडेआठच्या गर्दीच्या वेळेत झालेला हा प्रकार व मागील काही दिवसात पुणे शहरात होत असलेल्या गुन्हेगारी स्वरूपाच्या गोष्टी यावरून त्यांनी पोलिसांनी आता आत्मपरिक्षण करावे असेही कान टोचले होते.
त्यानंतर काही दिवसांमध्येच स्वारगेट बसस्थानकात बलात्कारासारखा गंभीर गुन्हा घडला. गुन्हे होऊच नये यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करणे अपेक्षित असताना या प्रकरणात पोलिसांनी तो गुन्हाच दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला असे आता समोर आले आहे. आदल्या दिवशी पहाटे घडलेला हा प्रकार एक संपूर्ण दिवस गेल्यानंतर उघडकीस आला. इतका उशीर का झाला याची चौकशी केल्यानंतर पोलिसांनीच हे प्रकरण दडवून ठेवल्याचे उघड झाले. पिडितेच्या पालकांनीच दबाव टाकला होता असे सांगण्यात येते, मात्र या एका दिवसात पोलिसांनी तपास काय केला? याविषयी ते काहीच सांगत नाहीत.
प्रकरणाचा वाचा फुटल्यानंतर माध्यमांच्या लक्षात त्याचे गांभीर्य आले, त्यानंतर त्वरेने हालचाली करत पोलिसांनी संबधित आरोपीचा माग काढला, त्याच्या घरापर्यंत पोहचले, त्याच्या भावाला ताब्यात घेण्यात आले. इतके सगळे करणारे पोलिस एक संपूर्ण दिवस काय करत होते असा प्रश्न यातून निर्माण झाला आहे. या प्रकरणाआधीही पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी, हेतूंविषयी शंका येईल असे अनेक प्रकार झाले आहेत. केंद्रीय मंत्र्यासारखा जबाबदार पदाधिकारी सांगत असतानाही पोलिस गुन्हेगारांना वचक बसेल असे काहीच करायला तयार नाही ही स्थिती पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे काढणारी आहे असे यासंदर्भात बोलले जात आहे.
सार्वजनिक ठिकाणी असणारी महिला व मुलींची सुरक्षा हा शहरात चर्चेचा विषय झाला आहे. पुण्यात अनेक महिला, मुली शिक्षण तसेच वेगवेगळ्या कारणांनी प्रवास करत असतात. परगावी जाताना अनेकदा रात्री किंवा अगदी पहाटेची वेळच निवडली जाते. या वेळेला महिला, मुलींना प्रवासासाठी पाठवावे की नाही यावरच या घटनेमुळे प्रश्नचिन्ह लागले आहे.