सह्याद्रीतील यकृत प्रत्यारोपण प्रकरणी चौकशींचा फार्स; ससूनची असमर्थता, जे. जे. रुग्णालयाकडे चौकशीची धुरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 12:56 IST2025-11-13T12:56:18+5:302025-11-13T12:56:51+5:30
पती-पत्नीच्या मृत्यूनंतर २ महिने होऊनही ठोस कारवाई न झाल्याने पोलिसांनी चौकशीची धुरा आता मुंबईतील जे. जे. रुग्णालयाकडे सोपवली आहे

सह्याद्रीतील यकृत प्रत्यारोपण प्रकरणी चौकशींचा फार्स; ससूनची असमर्थता, जे. जे. रुग्णालयाकडे चौकशीची धुरा
पुणे : डेक्कन परिसरातील सह्याद्री रुग्णालयात झालेल्या यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर दाता-पत्नी आणि प्राप्तकर्ता-पती अशा दोघांचा मृत्यू झालेल्या धक्कादायक प्रकरणी नेमलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीचा अहवाल अद्याप कार्यवाहीच्या प्रतीक्षेत आहे. दोन महिन्यांनंतरही ठोस कारवाई न झाल्याने या प्रकरणातील चौकशीचा फार्स सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान, वैद्यकीय हलगर्जीपणाच्या तपासासाठी ससून रुग्णालयाने असमर्थता दर्शवल्याने डेक्कन पोलिसांनी चौकशीची धुरा आता मुंबईतील जे. जे. रुग्णालयाकडे सोपवली आहे.
या प्रकरणात १५ ऑगस्ट रोजी यकृत प्रत्यारोपणानंतर प्राप्तकर्ता बापू कोमकर यांचे निधन झाले, तर दाता म्हणून यकृत देणाऱ्या त्यांच्या पत्नी कामिनी कोमकर यांचा २२ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर कोमकर कुटुंबीयांनी सह्याद्री रुग्णालयावर गंभीर वैद्यकीय हलगर्जीपणाचा आरोप करत डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनंतर राज्य आरोग्य विभागाने याप्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमली. इंटरनॅशनल लिव्हर ट्रान्सप्लांट सोसायटी, चेन्नईचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. मोहम्मद रेला यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली. समितीचे सदस्य सचिव म्हणून आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. भगवान पवार कार्यरत आहेत. समितीची पहिली बैठक २९ ऑगस्ट रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे झाली, तर २५ सप्टेंबरला समितीने प्रत्यक्ष सह्याद्री रुग्णालयाला भेट देऊन चौकशी केली. त्याच दिवशी दुसरी बैठक पार पडली होती. मात्र, दोन महिन्यांनंतरही या चौकशी अहवालाचा निष्कर्ष उघड करण्यात आलेला नाही.
दरम्यान, वैद्यकीय हलगर्जीपणाच्या तपासासाठी डेक्कन पोलिसांनी ससून रुग्णालय प्रशासनाला चौकशी करण्याचे पत्र पाठवले होते. परंतु, ससून रुग्णालयाने पोटविकारतज्ज्ञ आणि यकृत शल्यचिकित्सक नसल्याचे कारण देत चौकशी करण्यास नकार दिला. त्यामुळे आता डेक्कन पोलिसांनी ही जबाबदारी मुंबईतील जे. जे. रुग्णालयाला दिली आहे. तेथील वैद्यकीय तज्ज्ञ समिती या प्रकरणाचा तपास करणार आहे, अशी माहिती डेक्कन पोलिसांनी दिली.
सह्याद्री रुग्णालयातील प्रत्यारोपण शस्त्रक्रियांवरील स्थगिती कायम
दोन व्यक्तींचा जीव गमावणाऱ्या या प्रकरणात चौकशी अहवाल आणि दोषनिश्चिती दोन्हीही प्रलंबित राहिल्याने संबंधित यंत्रणांवर निष्क्रियतेचा ठपका ठेवला जात आहे. कोमकर कुटुंबीयांनी निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कारवाईची मागणी पुन्हा एकदा केली असून, आरोग्य विभागाच्या अहवालानंतरच सह्याद्री रुग्णालयातील प्रत्यारोपण शस्त्रक्रियांवरील स्थगिती उठवली जाण्याची शक्यता असल्याचे समजते.