International Women's Day Special: इडलीने सावरला संसार, दिला जगण्याला आधार; उद्योजिका गीता माला यांची संघर्षमय यशोगाथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 15:39 IST2026-03-08T15:38:17+5:302026-03-08T15:39:11+5:30
- गीता यांचे पती देवा माला एसटी महामंडळात तंत्रज्ञ होते. पण तुटपुंजा पगार आणि तोही वेळेवर मिळत नसे.

International Women's Day Special: इडलीने सावरला संसार, दिला जगण्याला आधार; उद्योजिका गीता माला यांची संघर्षमय यशोगाथा
- अमृता दातीर-जोशी
सांगवी : सांगवी परिसरातील घराघरांत आणि हॉटेल्समध्ये पोहोचणारी मऊ लुसलुशीत इडली केवळ पदार्थ नसून, गीता माला यांच्या २७ वर्षांच्या तपाचे आणि कष्टाचे फलित आहे. आज त्या दररोज ७०० ते ८०० इडल्या सांगवी, पिंपळे गुरव, नवी सांगवी आणि औंध परिसरात पुरवतात. संघर्ष आणि कष्टाच्या जोरावर त्या यशस्वी उद्योजिका बनल्या आहेत.
गीता यांचे पती देवा माला एसटी महामंडळात तंत्रज्ञ होते. पण तुटपुंजा पगार आणि तोही वेळेवर मिळत नसे. संसाराचा गाडा हाकण्यासाठी गीताताईंनी सुरुवातीला धुणीभांडी आणि स्वयंपाकाची कामे केली. यातून कशीबशी आर्थिक घडी बसवत असतानाच नियतीने आघात केला. त्यांच्या सात वर्षांच्या मुलीचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. आपण कामासाठी घराबाहेर असल्यामुळेच पोटच्या गोळ्याकडे दुर्लक्ष झाले, या अपराधी भावनेने त्या खचून गेल्या. मात्र लोकांनी आधार दिला.
त्यांच्या हाताच्या चवीचे कौतुक होत होते आणि यातूनच घराबाहेर न पडता व्यवसाय करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. दाक्षिणात्य संस्कृतीची जोड असल्याने त्यांनी इडली-चटणी पुरवण्याच्या व्यवसायाचा मार्ग निवडला. सुरुवातीला पती-पत्नी दोघांनी गल्लोगल्ली फिरून मार्केटिंग केले. चवीतील सातत्य आणि कामाप्रति निष्ठा यामुळे व्यवसायाला गती मिळाली. आता त्या स्वयंपाकाच्या ऑर्डरदेखील घेतात. स्वच्छता, टापटिपपणा आणि उत्तम दर्जा राखल्यामुळे दिवसेंदिवस ग्राहकसंख्याही वाढत आहे.
आज परिस्थिती बदलली आहे. पती सेवानिवृत्त होऊन पूर्णवेळ साथ देत आहेत, तर मुलगीही खांद्याला खांदा लावून उभी आहे. या कामात पूजा परिमल, वेलांकिनी जॉर्ज यांची साथ लाभत आहे. कष्टाच्या जोरावर स्वतःचे पत्र्याचे घर उभे केले असून, मुलीला उच्च शिक्षण देण्याचे आणि मोठे घर बांधण्याचे स्वप्न त्या उराशी बाळगून आहेत. कमी नफा, पण दर्जेदार उत्पादन हेच त्यांचे ब्रीदवाक्य आहे. अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान म्हणून त्या ओळखल्या जातात.
कोरोनातही व्यवसायाला संजीवनी
कोरोनाच्या काळात जेव्हा जग ठप्प झाले, तेव्हाही त्या डगमगल्या नाहीत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने अवघ्या १५ रुपयांत पोळी-भाजीची पार्सल सेवा देऊन त्यांनी गरजूंची सेवा केली आणि व्यवसायाला संजीवनी दिली.