२९ वर्षांपूर्वी कुस्ती खेळताना दुखापत; आता केली शस्त्रक्रिया, खासदार मुरलीधर मोहोळ एक महिनाभर विश्रांती घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 15:45 IST2026-03-14T15:45:20+5:302026-03-14T15:45:54+5:30
अधिवेशन, कामानिमित्त देशभरातील प्रवास, पुणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क, यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पण आहे या सगळ्याचं काय? यासाठी लवकरच सेवेत रुजू होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

२९ वर्षांपूर्वी कुस्ती खेळताना दुखापत; आता केली शस्त्रक्रिया, खासदार मुरलीधर मोहोळ एक महिनाभर विश्रांती घेणार
पुणे : पुण्याचे खासदार आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे रुग्णालयात दाखल झाले आहेत. कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना झालेल्या दुखापतीकडे त्यांनी दुर्लक्ष केले होते. आता तो त्रास वाढल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आजपासून एक महिनाभर विश्रांती घेणार असल्याचे त्यांनी समाजमाध्यमांवर सांगितले आहे.
२९ वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना दुखापत झाली होती. या दुखापतीमुळेच कुस्ती कायमची सुटली. परंतु ते दुखणं आता २९ वर्षांनंतर पुन्हा उदभवल आहे. हळूहळू तो त्रास वाढू लागल्याने डॅाक्टरांनी ह्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. त्यामुळे किमान एक महिन्याकरता विश्रांती घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. संसदेचं अधिवेशन सुरू असतानाही शस्त्रक्रिया करावी लागली. अधिवेशन, कामानिमित्त देशभरातील प्रवास, पुणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क तसेच इतर कामे होती. तसेच यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पण आहे या सगळ्याचं काय? यासाठी लवकरच सेवेत रुजू होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दुखापतीच्या त्रासापेक्षा या सगळ्याचा त्रास जास्त होतोय. पण मला माहितीये तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादच्या जोरावर मी लवकरच बरा होऊन महिन्याभरातच पहिल्यापेक्षा जास्त जोमाने पुन्हा सर्वांच्या सेवेत हजर होईन असे त्यांनी सांगितले.
मुरलीधर मोहोळ यांची सोशल मीडिया पोस्ट
क्षमस्व… पण एक महिन्याची सक्तीची विश्रांती !
२९ वर्षांपूर्वी... कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना झालेली दुखापत, या दुखापतीमुळेच कुस्ती कायमची सुटली... इतकी वर्षे दुर्लक्ष केलं पण आता २९ वर्षांनंतर हळूहळू तो त्रास वाढू लागला, शेवटी डॅाक्टरांनी ह्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचे सांगितलं. त्यामुळे किमान एक महिन्याकरता ही विश्रांती !
खरंतर संसदेचं अधिवेशन सुरू असतानाही शस्त्रक्रिया करावी लागली. अधिवेशन, कामानिमित्त देशभरातील प्रवास, माझ्या पुणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क तसेच इतर कामे… आणि शिवाय यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा… या सगळ्याचं काय?
दुखापतीच्या त्रासापेक्षा या सगळ्याचा त्रास जास्त होतोय. पण मला माहितीये तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादच्या जोरावर मी लवकरच बरा होऊन महिन्याभरातच पुन्हा तुम्हा सर्वांच्या सेवेत हजर होईन, पहिल्यापेक्षा जास्त जोमाने…