सणवारात महागाईचा तडाखा! तेल, भाज्यांच्या दरवाढीचा कहर; वर्षभरात गॅसच्या दरात '२६०' रुपयांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 15:36 IST2021-08-23T15:35:47+5:302021-08-23T15:36:48+5:30
गॅस, खाद्यतेल, भाजीपाला, फळभाज्या यांच्या दरवाढीने सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला

सणवारात महागाईचा तडाखा! तेल, भाज्यांच्या दरवाढीचा कहर; वर्षभरात गॅसच्या दरात '२६०' रुपयांची वाढ
अभिजित कोळपे
पुणे : श्रावण महिन्यापासून विविध सणवारांना आपल्याकडे सुरूवात होते. मात्र, नेमकी याचकाळात दरवर्षी खाद्यतेल, भाजीपाला, फळभाज्यांचे भाव वाढत असतात. यंदा तर दरवाढीचा कहर झाला आहे. खाद्यतेलाचे दर दुप्पटीहून वाढले आहेत तर गॅसचे दर महिन्याला वाढत आहे. गेल्या अडीच महिन्यांत गॅसचे दर ६०-६५ रूपयांनी (वर्षभरात २६०-२६५ रूपये) वाढले आहेत. सोबतीला साखर ४०-४२ किलोपर्यंत पाेहोचल्याने सर्वसामान्य कुटुंब मेटाकुटीला आले आहेत.
सध्या प्रत्येक वस्तूंचे भाव वाढत आहे. तेल, साखर, गॅस या प्रत्येक कुटुंबाच्या दैनंदिन गरजा आहेत. सोबतीला दैनंदिन भाजीपाला, फळभाज्या आवश्यक आहे. या सर्वांचे दर सातत्याने वाढत आहेत. मात्र, याबाबत राज्य असो की केंद्र सरकार. दोघेही दुर्लक्ष करत आहे. सर्वसामान्यांच्या जीवनमरणाचे त्यांना काही पडले नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया गृहिणी देत आहेत. या महागाईचा सर्वात जास्त फटका गृहिणींना बसत आहे. घरसंसार चालवताना अक्षरक्ष: त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
''कोरोना काळात आमचे रोजगार गेले आहे. गॅसचे दर दरमहिन्याला वाढत आहे. केंंद्र सरकारने सबसिडी बंद केली आहे. साथीला वर्षभरापासून तेलाचे दर दुप्पट झाले आहेत. त्यातच आता भाजीपालाचे दरही सातत्याने वाढत आहेत. गरीबांच्या जगण्या-मरण्याचा शासनाला काही घेणं-देणं नसल्याचे हे धोतक आहे, असेच आम्हाला आता वाटायला लागले आहे.'' असे गृहिणी मोहिनी साबळे यांनी सांगितलं.
''होलसेल बाजारातील परिस्थिती वेगळी असते. मात्र, किरकोळ बाजारातील छोठे-मोठे व्यापारी पाऊस, मालाची आवक कमी असल्याचे सांगून प्रंचड भाववाढ करतात. वेगवेगळ्या कारणामुळे प्रत्येकाला होलसेल बाजारात जाऊन भाजीपाला खरेदी करता येत नाही. कोरोनामुळे वर्षभरापासून आर्थिक स्थिती बेताचीच झाली आहे. त्यात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. सर्वसामान्यांनी कसे जगायचे. असं गृहिणी नंदा ढवळे म्हणाल्या आहेत.''
''१४ आणि १५ ऑगस्टला जोडून सुटी आल्याने मार्केट यार्डात दुसऱ्या दिवशी भाजीपाल्याची आवक दुप्पट झाली होती. तेव्हा दर निम्म्याने उतरल्याने चांगले दरही मिळू शकले नाहीत. आम्हाला व्यापाऱ्यांकडून आपेक्षित दर मिळत नाही. किरकोळ व्यापारी मात्र शहराच्या विविध भागात घेतलेल्या भावापेक्षा दुप्पट-तिप्पट दराने मालाची विक्री करत आहेत. पिकवणाऱ्याचा उत्पादन आणि वाहतूक खर्चही निघत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती कधी बदलणार आहे.''
प्रताप कदम, शेतकरी
...असे वाढले गॅसचे दर
महिना दर (रूपये)
ऑगस्ट २०२० ६१०
डिसेंबर २०२० ६६१
फेब्रुवारी २०२१ ७३८
एप्रिल २०२१ ८३१
मे २०२१ ८१२
ऑगस्ट २०२१ ८७५