पाकिस्तानचे ४८ तासांचे नियोजन भारतीय लष्कराने ८ तासात उधळले;चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 21:15 IST2025-06-03T21:14:28+5:302025-06-03T21:15:12+5:30

- ‘पहलगाम येथील दहशतवादी हल्ला भीषण होता. अनेकांना त्यांच्या कुटुंबियांसमोर धर्म विचारून क्रूरपणे गोळ्या घातल्या. या घटनेनंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ ही त्यावरील तत्काळ आणि कठोर प्रतिक्रिया होती.

Indian Army foiled Pakistan 48-hour plan in 8 hours; says Chief of Defence Staff Anil Chauhan | पाकिस्तानचे ४८ तासांचे नियोजन भारतीय लष्कराने ८ तासात उधळले;चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांची माहिती

पाकिस्तानचे ४८ तासांचे नियोजन भारतीय लष्कराने ८ तासात उधळले;चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांची माहिती

-अंकिता कोठारे 

पुणे :
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंंतर भारतीय लष्कराने मोठी कारवाई करत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर भारतालाही ४८ तासांत शरणागती पत्करण्यास प्रवृत्त करू, अशी वल्गना पाकिस्तानने केली होती. मात्र, भारतीय लष्कराने दिलेल्या उत्तराने पाकिस्तानची कारवाई अवघ्या आठ तासांतच संपविली, अशी स्पष्टोक्ती चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘संरक्षण आणि सामरिक अभ्यास विभागा’तर्फे ‘भविष्यातील युद्ध आणि युद्धतंत्र’ या विषयावर चौहान यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. चारुशीला गायके, संरक्षण आणि सामरिक अभ्यास विभागाचे प्रमुख विजय खरे आदी उपस्थित होते. चौहान यांनी पहलगाम व अन्य लष्करी कारवायासंदर्भात त्यांनी भाष्य केले. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत त्यांनी पाकिस्तानच्या त्या फोनबाबतही भूमिका मांडली.

चौहान म्हणाले, ‘पहलगाम येथील दहशतवादी हल्ला भीषण होता. अनेकांना त्यांच्या कुटुंबियांसमोर धर्म विचारून क्रूरपणे गोळ्या घातल्या. या घटनेनंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ ही त्यावरील तत्काळ आणि कठोर प्रतिक्रिया होती. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी अनेक प्रकारच्या संरक्षण क्षमता आत्मसात केल्या आहेत. युद्धभूमीत क्षमतेची चाचणी घेतली जाते. येथे नेहमीच धोका असतो पण तुम्ही धोका पत्करत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. भारत आता दहशतवाद सहन करणार नाही. भारतावर हल्ला झाला, तर त्याचे प्रत्युत्तरही अधिक कठोर आणि अचूक दिले जाणार आहे. त्यामुळे ऑपरेशन सिंदूर अद्याप पूर्णपणे संपलेले नसून केवळ तात्पुरता शांतता करार झाला आहे. यासाठी सजग राहण्याची गरज आहे. पाकिस्तानने भारताला दहशतवादी कारवायांद्वारे वेठीस धरू नये. भारत आता दहशतवाद आणि अणुबॉम्बच्या दहशतीखाली जगणार नाही,’ असेही जनरल चौहान यांनी स्पष्ट केले.

Web Title: Indian Army foiled Pakistan 48-hour plan in 8 hours; says Chief of Defence Staff Anil Chauhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.