Maratha Kranti Morcha: ‘सारथी’समोर तारादुतांचे आजपासून बेमुदत आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 16:17 IST2021-10-20T14:10:20+5:302021-10-20T16:17:08+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १९ जून २०२१ रोजी झालेल्या बैठकीत तारादूत प्रकल्प तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, चार महिने पूर्ण होत आले तरी तारादूत प्रकल्प हा सुरू झालेला नाही.

Maratha Kranti Morcha: ‘सारथी’समोर तारादुतांचे आजपासून बेमुदत आंदोलन
पुणे : मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक तसेच शाश्वत विकासासाठी, सारथीच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी तारादूत प्रकल्प हा महत्त्वाचा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी १९ जून २०२१ रोजी झालेल्या बैठकीत तारादूत प्रकल्प तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, चार महिने पूर्ण होत आले तरी तारादूत प्रकल्प हा सुरू झालेला नाही. त्यामुळे आजपासून (बुधवार) सारथीच्या कार्यालयासमोर (Sarthi) राज्यातील विविध भागातील ज्या तारादुतांनी आधी प्रशिक्षण घेतले आहे. ते सर्व तारादूत, विविध मराठा संघटना तसेच मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे पुणे समन्वयक सचिन आडेकर यांनी दिली.
सचिन आडेकर म्हणाले, ''१९ जून २०२१ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार, युवराज छत्रपती संभाजीराजे तसेच मराठा क्रांती मोर्चाचे सर्व समन्वयक आणि तारादूत प्रतिनिधी त्याचबरोबर सारथीच्या संचालक मंडळाबरोबर बैठक झाली होती. त्या बैठकीत अजित पवार यांनी तारादूत प्रकल्प सुरू करण्याचे आदेश सारथीच्या संचालक मंडळाला दिले होते. मात्र, चार महिने हाेत आले तरी तारादूत प्रकल्पाबाबत अद्यापही काहीच हालचाली सुरू झाल्या नाहीत.''
''उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात आदेश दिले आहेत. तरीही सारथीच्या संचालकांनी मंत्रालयात तारादुतांचा प्रस्ताव पाठवला आहे. तो चुकीचा आहे. मुळात प्रस्तावाची आवश्यकता नाही. तरीही प्रस्ताव देऊन तीन महिने उलटले तरी काहीच निर्णय होत नाही. प्रकल्प तात्काळ सुरू करून सर्व प्रशिक्षीत तारादुतांना सारथी अंतर्गत अथवा बाह्य स्त्रोतामार्फत नियुक्त्या द्याव्यात. या मागणीची अद्याप दखल घेत नाहीत. त्यामुळे राज्यातील सर्व भागातील तारादूत आजपासून (बुधवार) सारथीच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.''