Indapur Local Body Election Result 2025: बारामती सोबतच इंदापूरलाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता; आघाडी पराभूत, नगराध्यक्षपदी भरत शहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 16:56 IST2025-12-21T16:56:22+5:302025-12-21T16:56:53+5:30
Indapur Local Body Election Result 2025 भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना शिंदे गट व इतर लहानमोठ्या पक्षाच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृष्णा भीमा विकास आघाडी पॅनलचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप गारटकर यांना १२७ मतांनी पराभव स्वीकारावा लागला.

Indapur Local Body Election Result 2025: बारामती सोबतच इंदापूरलाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता; आघाडी पराभूत, नगराध्यक्षपदी भरत शहा
इंदापूर: इंदापूर नगरपरिषद निवडणूकीच्या आज झालेल्या मतमोजणीनंतर इंदापूरच्या मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा यांच्यासह नगरसेवक पदाच्या चौदा उमेदवारांना निवडून देत, नगरपरिषदेच्या आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे निर्भेळपणे इंदापूर नगरपरिषदेची सत्ता सोपवली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना शिंदे गट व इतर लहानमोठ्या पक्षाच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृष्णा भीमा विकास आघाडी पॅनलचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप गारटकर यांना १२७ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यांना नगरसेवक पदाच्या सहा जागांवर समाधान मानावे लागले.
येथील शासकीय गोदामात आज सकाळी आठ मतमोजणीच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. तीन फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. दहा वाजण्याच्या सुमारास टपाली मतदान मोजले गेले. पहिल्या पाऊण तासानंतर पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला. त्या फेरीत प्रदीप गारटकर यांना ३ हजार ६४१ मते तर भरत शहा यांना ३ हजार ५२२ मते मिळाली. या फेरीत गारटकर यांनी ११९ मतांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरीत भरत शहा यांनी १५७ मतांची आघाडी घेतली. त्यांना ३ हजार ८१९ मते मिळाली. प्रदीप गारटकर यांना ३ हजार ५४३मते मिळाली. तिसऱ्या फेरी अखेर भरत शहा यांना ९ हजार ८२५ मते मिळाली तर प्रदीप गारटकर यांना ९ हजार ६९८ मते मिळाली. त्यांना १२७ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. निकालानंतर गुलालाची उधळण करत भरत शहा विजयश्री मिळवलेल्या त्यांच्या सहकारी नगरसेवकांची संपूर्ण शहरातून मिरवणूक काढण्यात आली. खडकपुऱ्यावर मतदारांचे आभार मानण्यासाठी अनौपचारिक सभा घेण्यात आली.
निवडून आलेले उमेदवार -राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रभाग क्र. १ अ)- उमेश रमेश मखरे (७६८), प्रभाग क्र १ ब)- सुनिता अरविंद वाघ (९२३), प्रभाग क्र. २ अ)- सुनिता अमर नलवडे (७९६),प्रभाग क्र. ३अ) - वंदना भारत शिंदे (८४६), प्रभाग क्र. ४ ब) - शकील मकबूल सय्यद (९४५), प्रभाग क्र.५अ)- दिप्ती स्वप्नील राऊत (९०८),५ ब)- अक्षय शंकर सूर्यवंशी (८३५), प्रभाग क्र.६ अ) - शुभम पोपट पवार (१२१५), प्रभाग क्र. ७ ब)- मयुरी प्रशांत उंबरे (१९७६), प्रभाग क्र. ८ अ) सागर सुनिल अरगडे(१२८४), प्रभाग क्र. ८ ब) - रजिया हजरत शेख(९४४), प्रभाग क्र. ९अ) - शोभा सुरेश जावीर (१३६७), प्रभाग क्र.९ ब)- शैलेश देविदास.पवार (१६४५), प्रभाग क्र. १० अ )- अनिता अनिल ढावरे (११७८).(एकूण१४)
कृष्णा भिमा विकास आघाडी - प्रभाग क्र. २ ब)- अनिल सुदाम पवार (९१६), प्रभाग क्र. ३ ब) - गणेश नंदकुमार राऊत (७६८),प्रभाग क्र. ४ अ) - शकीला खाजा बागवान (११९९), प्रभाग क्र. ६ ब) - शीतल अतुल शेटे (१४९९) प्रभाग क्र.७अ) - सदफ वसीम बागवान (१०१०), १० ब) - सुधाकर संभाजी ढगे (९७२) ( एकूण ६)
येत्या पाच वर्षात उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने, निवडणूकीच्या प्रचारकाळात इंदापूरकरांना दिलेली व जाहिरनाम्यात नमूद केलेली वचने पूर्ण करुन,इंदापूर शहराचा चौफेर विकास करण्याचा प्रयत्न होईल - भरत शहा नवनिर्वाचित नगराध्यक्ष इंदापूर नगरपरिषद.
निवडणूक अटीतटीची झाल्यामुळे झालेला काठावरचा पराभव आम्ही मान्य करत आहोत. पुढच्या काळात नव्या जोमाने काम करु - प्रदीप गारटकर.नगराध्यक्ष पदाचे उमेदवार