Increased cases in the land sale cases at the maval | मावळात जमिनींच्या खरेदी विक्री, दाखल्यांसाठी वाढली लाचखोरी

मावळात जमिनींच्या खरेदी विक्री, दाखल्यांसाठी वाढली लाचखोरी

ठळक मुद्देमावळ तालुक्यात १०३ ग्रामपंचायती आहेत. तर दोन नगरपालिका तर एक नगरपंचायततालुक्यात तलाठी, मंडलाधिकारी कार्यालयात कामानुसार दर निश्चित काही लोकप्रतिनिधी ठेकेदारांकडून सर्रास पैसे घेऊ लागल्याने ठेकेदारही हतबलकाही अधिकारी व कर्मचारी जमिनींचे व्यवहार करून कोट्यधीश

वडगाव मावळ : पुणे-मुंबईचा दुवा असलेल्या मावळ तालुक्यातील जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. त्यामुळे धनिक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहेत. त्यातून मोठ मोठे गृहप्रकल्प उभे राहू लागले आहेत. त्यामुळे खरेदी-विक्री, ना हरकत दाखले, उताऱ्यावर नावांची नोंद करणे, जमिनीची सीमा निश्चित करणे, वीज जोडणी आदी अशा विविध कारणांसाठी महसूल, विद्युत, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर परिषद, पोलीस,  दुय्यम निबंधक, बांधकाम व इतर शासकीय खात्यात एक हजारांपासून लाखो रुपयांची लाच घेतली जात असल्याचे चित्र मावळात सुरू आहे.
चार दिवसांपूर्वी इलेक्ट्रिक वस्तूचे बील काढण्यासाठी साडेसात हजारांची लाच घेताना एका ग्रामसेवकाला व लोकप्रतिनिधीला अटक केली. गेल्या वर्षी ११ लाख रुपयांची लाच घेताना वनपालास अटक केली. सहा हजरांची लाच घेताना ग्रामसेवकाला अटक केली. दस्त नोंदणीसाठी आठ हजार घेताना दुय्यम निबंधकाला पकडले. ठेकेदाराकडून महावितरण अभियंत्यावर कारवाई झाली. ४० हजारांची लाच घेताना एका ग्रामसेवकाला पकडले. याशिवाय काही तलाठी, मंडलाधिकारी लाच प्रकरणात सापडले. त्यानंतर ग्रामसेवक व शिपाई आत्ता ग्रामसेवक व सरपंचाला पकडले. 
मावळ तालुक्यात १०३ ग्रामपंचायती आहेत. तर दोन नगरपालिका तर एक नगरपंचायत आहे. या हद्दीत विविध गृहप्रकल्प, प्लॉटींग व इतर कामे चालू आहेत. या कामांसाठी ना हरकत दाखल्याची आवश्यकता असते. ते देण्यासाठी काही ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, नगरसेवक, लिपिक यांनी दर ठरवले आहेत. बाहेरील व्यावसायिकांपेक्षा स्थानिकांकडून कमी रक्कम घेतली जाते. तसेच किमती वस्तूंच्या स्वरूपातही लाच स्वीकारली जात आहे. तालुक्यात तलाठी, मंडलाधिकारी कार्यालयात कामानुसार दर निश्चित केले आहेत. सातबारा उतारा, फेरफार, वारस, खरेदी नोंदी यासाठी क्षेत्रानुसार व तेथील जमिनीच्या दरानुसार रक्कम घेतली जाते. अनेक शासकीय कार्यालयात खासगी मदतनीस ठेवले आहेत. त्यांच्यामार्फत ही रक्कम घेतली जाते. नगरपालिका, नगरपंचायत हद्दीत बांधकाम आराखडा मंजूर करण्यासाठी अधिकारी लाखो रुपये घेतात. ते न दिल्यास काहीतरी बाब सांगून आराखडा मंजूर करत नाही. तालुक्याचे वडगाव हे मुख्य केंद्र असून सर्व शासकीय कार्यालय आहेत. परंतु अनेक ठिकाणी लाच घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही लोकप्रतिनिधी ठेकेदारांकडून सर्रास पैसे घेऊ लागल्याने ठेकेदारही हतबल झाले आहेत. 
...........
अधिकारी झाले कोट्यधीश
काही अधिकारी व कर्मचारी जमिनींचे व्यवहार करून कोट्यधीश झाले आहेत. तर काही पोलीस अधिकाºयांनी जमिनींच्या ‘मॅटर’ची ‘सुपारी’ घेऊनच बक्कळ कमाई करून गडगंज झाले आहेत. मावळ तालुका हा सोन्याचे अंडे देणारा तालुका असल्याने शासकीय अधिकारी पुन्हा मावळात येण्यासाठी इच्छुक झाले आहेत.
............
नागरिकांनी कोणालाही लाच देऊ नये. तसे करणे कायद्याने गुन्हा आहे. तसेच कोणी लाच मागत असल्यास त्याबाबत तक्रार करावी. शासकीय सेवेत असलेल्या लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधावा. - राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत विभाग, पुणे.
..........

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Increased cases in the land sale cases at the maval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.