इंडिगोच्या फ्लाईटमध्ये गैरसोय, पतीला पत्नीच्या शेजारी आसन दिले नाही, भाजप प्रवक्त्याचे मोहोळ यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 11:58 IST2025-07-23T11:58:03+5:302025-07-23T11:58:15+5:30
भाजप प्रवक्त्याने विमान प्रवासात होणाऱ्या गैरसोयीचा पाढाही मुरलीधर मोहोळ यांना वाचून दाखवला आहे

इंडिगोच्या फ्लाईटमध्ये गैरसोय, पतीला पत्नीच्या शेजारी आसन दिले नाही, भाजप प्रवक्त्याचे मोहोळ यांना पत्र
पुणे: इंडिगोच्या फ्लाईटमध्ये एका पती पत्नीला शेजारी - शेजारी सीट न दिल्याने गैरसोय झाल्याचे पत्र भाजप प्रवक्त्याने थेट केंद्रीय नागरी उड्डाण व सहकारिता राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना दिले आहे. मुंबई ते नैरोबीच्या फ्लाईट मध्ये पती - पत्नीला वेगवेगळे आसन क्रमांक दिले. यावरून भाजप प्रवक्ते खर्डेकर यांनी थेट केंद्रीय मंत्र्याकडे पत्र लिहून तक्रार केली. यासोबतच विमान प्रवासात होणाऱ्या गैरसोयीचा पाढाच या पत्रात संदीप खर्डेकर यांनी वाचला आहे.
संदीप खर्डेकर यांचं पत्र
प्रती,
मा. ना. मुरलीधरअण्णा मोहोळ,
केंद्रीय नागरी उड्डाण व सहकारिता राज्यमंत्री.
विषय - "इंडिगो" च्या सेवेतील त्रुटी बाबत....
मा. महोदय,
आपण एक कार्यतत्पर मंत्री आहात अशी आपली ख्याती आहे. सध्या वारंवार इंडिगो विमान सेवेबाबत माध्यमातून वाचायला मिळत आहे. व अनेकदा उड्डाणं झाल्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे विमानाचे पुन्हा लँडिंग झाल्याच्या बातम्या देखील येत आहेत. मी ह्या निवेदनाद्वारे आपणास विनंती करतो की त्वरित इंडिगो च्या प्रमुखांची बैठक आयोजित करावी व सामान्य प्रवश्यांच्या तक्रारी दूर कराव्यात.मला स्वतःला गैरसोयींचे आलेले काही अनुभव याठिकाणी नमूद करत आहे...
१) इंडिगो च्या विमानाने 13 जुलै ला नैरोबी साठी उड्डाण केल्यावर माझे आसन हे मागे जात नव्हते. महत्प्रयासाने हवाईसुंदरींनी ते रिलेक्स अवस्थेत करून दिले व विमान नैरोबीला उतरताना देखील त्यांनीच पुढे प्रयत्नपूर्वक करून दिले. काल रात्री नैरोबी ते मुंबई उड्डानादरम्यान पण असाच अनुभव आला व हवाई सुंदरीने खूप प्रयत्न करून देखील ( सीट नंबर E 23) त्यांना जमले नाही व त्यांनीच मला तक्रार करायला सांगितले. त्यामुळे विमानाच्या देखभालीचा (मेंटेनन्स) विषय ऐरणीवर आला आहे.
२) काल नैरोबी येथून इंडिगो ने प्रवास करून मुंबई विमानतळावर उतरलो असता बॅगेज बेल्टवर बॅग घेण्यास गेलो असता बहुतांश बॅग ह्या पावसात भिजलेल्या आढळून आल्या, त्या भिजू नयेत याची संबंधित कंपनीने दक्षता घेणे गरजेचे वाटते.
३) आपल्याला कल्पना असेल की, विमानाच्या लँडिंग च्या वेळी झटके बसून प्रवाश्यांचे डोकं आपटू नये म्हणून ही काळजी घेतली जाते. त्यासाठी खुर्ची पुढे घेण्यासाठी विमान कंपन्या प्रचंड आग्रही असतात.
४) विमान कंपनीचे पोर्टर म्हणजे बॅग भरून विमानात ठेवणारे व नंतर काढून बॅगेज बेल्ट वर सोडताना ते नीट हाताळणी करत नाहीत. व त्यातून बॅग खराब होणे, महागड्या बॅग ला पोचा पडणे असे प्रकार घडतात, त्यामुळे हाताळणी नीट करण्याबाबत विमान कंपन्यांना समज द्यावी.
५) 21 सप्टेंबर 2024 ला माझ्या नातेवाईकांना आलेला अनुभव तर अत्यंत क्लेशकारक असून त्यांची केवळ बॅग नादुरुस्त झाली असं नव्हे तर तर बॅगेतील नेकलेस देखील गायब झाले. याबाबत आपणाकडे तक्रार केल्यावर इंडिगो ने अवघे 2000 रुपये बॅगेची नुकसानभरपाई देणे मान्य केले व नेकलेस बाबत मात्र जबाबदारी झटकली. त्यामुळे ह्याबाबत ही संबंधित कंपनीला समज द्यावी व यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी दक्षता घेण्यास सांगावे.
६) पैसा कमविण्याच्या नादात संबंधित विमान कंपनी ऑनलाईन सीट कन्फर्मेशन करताना खिडकीच्या किंवा पुढच्या पसंतीच्या सीट साठी अतिरिक्त पैसे मागते. इथपर्यंत ठीक आहे. मात्र विमानतळावर चेक इन करताना नवरा बायकोला वेगवेगळ्या सीट दिल्या जातात ह्यात बदल व्हायला हवा. मला ही मुंबई नैरोबी प्रवासात हाच अनुभव मुंबई विमानतळावर आला. तेथील इंडिगो प्रतिनिधी अंजली चौधरी यांनी ह्या लांबच्या प्रवासात मला व पत्नीला वेगवेगळ्या ठिकाणचे आसन क्रमांक दिले, त्यांना विनंती केली असता "मी काही करू शकत नाही, तुम्हाला कुठे तक्रार करायची ते करा, सह प्रवाश्याशी बोलून जागा बदलून घ्या" अशी उत्तरे देण्यात आली. तरी ह्या प्रक्रियेत बदल व्हावा ही आग्रही विनंती.
तसेच प्रवासादरम्यान त्यांचे कर्मचारी मराठीत बोलत नसल्याचेही निदर्शनास आले, किंबहुना त्यांच्या विमानांतर्गत उदघोषणेतही मराठी चा वापर दिसून येत नाही. किमान महाराष्ट्रात येणाऱ्या वा जाणाऱ्या विमानातून एका कर्मचाऱ्याने तरी मराठी बोलावे अशी अपेक्षा आहे. याबाबत ही योग्य सूचना द्याव्यात ही विनंती.
- आपला,संदीप खर्डेकर