Pune: येरवडा, लोहगाव परिसरात कोयते उगारून दहशत अन् वाहनांची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 12:00 IST2024-02-19T11:56:51+5:302024-02-19T12:00:02+5:30

येरवड्यातील पांडू लमाण वसाहतीत ही घटना घडली...

Inciting terror and vandalism of vehicles in Yerawada, Lohgaon area | Pune: येरवडा, लोहगाव परिसरात कोयते उगारून दहशत अन् वाहनांची तोडफोड

Pune: येरवडा, लोहगाव परिसरात कोयते उगारून दहशत अन् वाहनांची तोडफोड

पुणे : शहरात दहशत माजविणाऱ्या गुंडांवर कडक कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्यानंतरही टाेळक्याने येरवडा, लोहगाव भागात वाहनांची तोडफोड केल्याचे समाेर आले आहे. येरवड्यातील पांडू लमाण वसाहतीत ही घटना घडली. याप्रकरणी सोहम शशी चव्हाण आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जुगनू राकेश परदेशी (४०, रा. भोरी चाळ, पांडू लमाण वसाहत, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

आरोपी चव्हाण आणि परदेशी ओळखीचे आहेत. चव्हाण आणि साथीदार शनिवारी पांडू लमाण वसाहतीत शिरले. शिवीगाळ करून नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवला. कोयते उगारून दहशत माजवली. परदेशी यांचा भाचा अनिकेत सोनकरला मारहाण केली. या भागातील वाहनांची तोडफोड करून टोळके पसार झाले. अधिक तपास उपनिरीक्षक सुर्वे करत आहेत.

दुसऱ्या घटनेत लोहगाव परिसरातील कलवड वस्तीत टोळक्याने दहशत माजवल्याची घटना घडली. टोळक्याने दोन रिक्षांवर दगडफेक केली. याप्रकरणी करण विजय दोरकर (१९, रा. पठारे वस्ती, लोहगाव), शाबाद आयुब औटी (१८, रा. मुंजाबा वस्ती, लोहगाव) तसेच दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अमोल अनंत कानू (३९, रा. कलवड वस्ती, लोहगाव) यांनी फिर्याद दिली. दोरकर, औटी आणि अल्पवयीन साथीदार लोहगावमधील कलवड वस्ती परिसरात आले. त्यांनी जुबेर कोठे राहतो, अशी विचारणा करून शिवीगाळ केली. आरोपींनी कोयते उगारून दहशत माजवली. दोन रिक्षांच्या काचांवर दगडफेक केली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक तोरडमल तपास करत आहेत.

Web Title: Inciting terror and vandalism of vehicles in Yerawada, Lohgaon area