सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 07:21 IST2025-05-02T07:20:01+5:302025-05-02T07:21:22+5:30
अजित पवार म्हणाले, सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले. ज्यांनी या पुलाचा पाठपुरावा केला त्यांचेसुद्धा अभिनंदन. सिंहगड रोड पुलामुळे नागरिकांचा अर्धा तास कमी होईल.

सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
पुणे : सिंहगड रस्त्यावरील (नरवीर तानाजी मालुसरे रस्ता) विठ्ठलवाडी ते फन टाइम थिएटर यादरम्यानचा उड्डाणपूल खुला करण्यास गुरुवारी मुहूर्त मिळाला. या एकेरी उड्डाणपुलाचे उद्घाटन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.
यामुळे राजाराम पुलाकडून वडगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांची महाराष्ट्र दिनी वाहतूककोंडीतून मुक्तता होणार आहे. सकाळी उद्घाटन केले तर इतरांना कामाचा त्रास होतो, उशिरा उठणाऱ्या लोकांनासुद्धा लवकर उठावे लागते, अशी मिश्कील टिप्पणी अजित पवार यांनी यावेळी केली.
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
अजित पवार म्हणाले, सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले. ज्यांनी या पुलाचा पाठपुरावा केला त्यांचेसुद्धा अभिनंदन. सिंहगड रोड पुलामुळे नागरिकांचा अर्धा तास कमी होईल. या उड्डाणपुलाचे काम २१ सप्टेंबर २०२१ मध्ये सुरू करण्यात आले. ७१ पिलर्स आणि १०६ गर्डर उभारले आहेत. विठ्ठलवाडीकडून स्वारगेटकडे येण्यासाठी राजाराम पूल चौकात उभारलेला उड्डाणपूल यापूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांची नाराजी
परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार होते. या कार्यक्रमाची वेळ सकाळी ६.३० वाजताची होती. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमाच्या नियोजित वेळेपूर्वीच त्या ठिकाणी पोहोचले आणि उद्घाटन केले. यावरून भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली. माझी विनंती आहे की, दादांनी रात्रीची किंवा दिवसाची कुठली ही वेळ द्या, पण एक वेळ घोषित करा, असे त्यांनी सांगितले.
कुलकर्णी म्हणाल्या, मी विषय वाढवणार नव्हते. तुम्ही आला म्हणून सांगते. १० मिनिट लवकर उद्घाटन झाले. नक्कीच मला वाईट वाटते. दादांनी वेळेच्या पूर्वी उद्घाटन करू नये एवढीच माझी विनंती आहे.