पुणे: बाणेर येथे महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या कौशल्यविकास केंद्र प्रकल्पाच्या भूमिपूजनावरून दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. त्यातच महापालिकेने या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी वेळ द्यावी, अशी विनंती थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या केंद्राच्या भूमिपूजनावरून महायुती सरकारमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
बाणेर येथे टाटा ग्रुपच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून कौशल्यविकास केंद्र प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी १६५ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. हा प्रकल्पासाठी महापालिकेने जागा दिली असून, तेथे हा प्रकल्प उभारला जाणार आहे. टाटा टेक्नोलॉजी लिमिटेड या संस्थेमार्फत या प्रशिक्षण केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. या प्रशिक्षण केंद्रातून अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील तांत्रिक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी अंदाजे सात हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे.
या केंद्राचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापैकी कोणाच्या हस्ते करायचे यावरून वाद सुरू आहे. या भूमिपूजनासाठी दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एकाच व्यक्तीला यासाठी बोलवावे, अशी भूमिका शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून घेण्यात आल्याने महापालिकेची पंचाईत झाली आहे. शिंदे यांच्याकडे महापालिकेकडून गेल्या आठवड्यात विचारणा करण्यात आली होती. मात्र, त्यांनी वेळ नसल्याचे कारण दिले होते. या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी एकाही उपमुख्यमंत्र्याला डावलल्यास त्यांची नाराजी महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या अंगाशी येणार आहे.
यावर तोडगा काढण्यासाठी या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. यासाठी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठविले असून, भूमिपूजनासाठी वेळ देण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे उद्घाटनासाठी आल्यास दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणाचीही नाराजी अधिकाऱ्यांना सहन करावी लागू नये, यासाठी हे पत्र देण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.