पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षाची वकील महिलेला मारहाण, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 13:20 IST2023-02-14T13:18:22+5:302023-02-14T13:20:46+5:30
चित्रा वाघ यांनी देखील या प्रकारावरून पुणे पोलिसांना धारेवर धरले

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षाची वकील महिलेला मारहाण, गुन्हा दाखल
पुणे/किरण शिंदे: पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दयानंद इरकल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दयानंद इरकल यांनी एका वकील महिलेला भर रस्त्यात मारहाण केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. या महिलेच्या तक्रारीनंतर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात या प्रकरणी विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री हा प्रकार घडला.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी तुम्ही या वकील आहे. सोमवारी रात्री त्या दुचाकीने जात होत्या. दुचाकी जात असताना त्यांनी दयानंद इरकल यांच्या चारचाकी वाहनाला ओव्हरटेक केले. याचाच राग आल्याने दयानंद इरकल आणि त्याच्यासोबत असणाऱ्या एका महिलेने फिर्यादी तरुणीला मारहाण करत विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.
दरम्यान भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील या प्रकारावरून पुणे पोलिसांना धारेवर धरले आहे. पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.