संतापजनक! पुण्यात कबुतर चोरीचा आरोप करत अल्पवयीन बालकाला पट्ट्याने मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 14:25 IST2022-02-17T14:25:31+5:302022-02-17T14:25:52+5:30
जखमी बालकाच्या वैद्यकीय तपासणी नंतर गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या येरवडा पोलीस स्टेशन येथे सुरू आहे

संतापजनक! पुण्यात कबुतर चोरीचा आरोप करत अल्पवयीन बालकाला पट्ट्याने मारहाण
येरवडा : कबूतर चोरीचा आरोप करत शाळेच्या आवारात अल्पवयीन बालकाला पट्ट्याने व बॅटने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी दुपारी येरवडा येथे घडला. या प्रकरणी रात्री उशिरा पालकांनी येरवडा पोलिसांकडे घटनेची नोंद केली आहे. जखमी बालकाच्या वैद्यकीय तपासणी नंतर गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या येरवडा पोलीस स्टेशन येथे सुरू आहे. याप्रकरणी तीन संशयित बालकांना येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये दोन अल्पवयीन तसेच एका सज्ञान बालकाचा समावेश आहे.
येरवड्यातील गोल्फ क्लब जवळ असणाऱ्या औद्योगिक वसाहती समोरच्या पुणे महापालिकेच्या अनुसयाबाई सावंत शाळेच्या आवारात हि घटना घडली. बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एका अल्पवयीन बालकाला इतर दोन मुले कबूतर चोरल्याच्या वादातून पट्ट्याने बॅटने बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ त्यांच्या तिसऱ्या साथीदाराने काढला. बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पालकांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी येरवडा पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. याप्रकरणी जखमी बालकाचे वैद्यकीय तपासणी करून अहवाल मिळाल्यानंतर गुरुवारी सकाळी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
गंभीर बाब म्हणजे या घटनेतून बुधवारी अल्पवयीन बालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तसेच या निमित्ताने पुणे महापालिका शाळांच्या आवारातील सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण होत आहे. या गंभीर प्रकरणी येरवडा पोलीस काय गुन्हा दाखल करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.