महिलांच्या खात्यात दहा हजार...;शरद पवारांनी सांगितलं एनडीएच्या बिहार निवडणुकीच्या यशाचं गणित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 08:54 IST2025-11-16T08:53:53+5:302025-11-16T08:54:15+5:30
एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप करणं योग्य आहे का? याचा विचार जाणकारांनी आणि निवडणूक आयोगाने सुद्धा केला पाहिजे. निवडणुका या स्वच्छ, पारदर्शक पद्धतीने हव्यात. याबाबत कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही.

महिलांच्या खात्यात दहा हजार...;शरद पवारांनी सांगितलं एनडीएच्या बिहार निवडणुकीच्या यशाचं गणित
बारामती - महाराष्ट्रात लाडकी बहिण योजना राबविल्यानंतर हेच घडलं होतं. त्याचप्रमाणे बिहारमध्ये सत्ता हाती असणार्यांनी निवडणुकीदरम्यान प्रत्येक महिलेच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये वाटप केले. या निवडणुकीत महिलांनी मतदान हाती घेतलं, त्याचाच परिणाम बिहार निवडणुकीच्या निकालावर दिसतोय, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बिहार निवडणुकीत एनडीएने मिळविलेल्या यशाबाबत भाष्य केलं.
ज्येष्ठ नेते शरद पवार बारामती दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी गोविंदबाग निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना बिहार निवडणुकीवर हे मत व्यक्त केले. शरद पवार पुढे म्हणाले, “आता प्रश्न असा आहे की इथून पुढच्या निवडणुकीत ज्याच्या हातात सत्ता आहे, त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशाचं वाटप करून निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका घेतली तर निवडणूक पद्धतीबद्दल लोकांच्या विश्वासाला धक्का बसेल, याची चिंता आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप करणं योग्य आहे का? याचा विचार जाणकारांनी आणि निवडणूक आयोगाने सुद्धा केला पाहिजे. निवडणुका या स्वच्छ, पारदर्शक पद्धतीने हव्यात. याबाबत कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. मात्र दहा-दहा हजार रुपये वाटणं ही काय लहान रक्कम नाही. सध्या सर्व राज्यात ५० टक्के मतदान हे महिलांचं आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी त्यांना सरकारी खजिन्यातील रक्कम देणं योग्य आहे का? दहा हजार रुपये देणं आणि त्यानंतर निवडणुकीला सामोरे जाणं याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ वातावरणात होतात का, याबाबत लोकांच्या मनात शंका आहे. याचा विचार निवडणूक आयोगाने केला पाहिजे. संसदेत या विषयावर चर्चा करू,” असेही शरद पवार म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत शरद पवार म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुठे-कुठे युती झाली आहे, मला माहित नाही. माझ्या पक्षापुरतं मी सांगतो की आमच्यात अशी चर्चा झाली आहे की स्थानिक निवडणुका आम्ही पक्ष म्हणून लढवत नाही. त्या-त्या तालुक्यात, जिल्ह्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा. हा अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आहे,” असे शरद पवार म्हणाले.
“मी एकेकाळी बारामती बघत होतो. बारामतीचं वैशिष्ट्य असं आहे की ५० वर्षांपूर्वी नगरपालिकेची निवडणूक आली की मतदानाच्या आदल्या दिवशी लोक वाट बघायचे. कशासाठी वाट बघायचे हे सांगायची गोष्ट नाही. ते वाटून झालं की निवडणुकीचा निकाल काय लागलाय हे कळायचं! हे लहान प्रमाणात होतं,” असंही यावेळी शरद पवार म्हणाले.