पुणे: “नैसर्गिक संकटावेळी शेतकऱ्यांना मदत करण्याची केंद्र व राज्य सरकारची जबाबदारी आहे. या आपत्तीत या आपत्तीत पिके, गुरेढोरे यांचे नुकसान झालेच आहे. तसेच जमीनही वाहून गेली आहे. पीक वाहून गेल्यास त्या वर्षाचे नुकसान होईल. मात्र, जमीन वाहून गेल्यास शेतकऱ्यांचा उत्पादन मिळण्याचा मार्ग कायमचा थांबतो. त्यामुळे केवळ पंचनामे करून मदत देऊन भागणार नाही. त्यासाठी या अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदत करावी,” अशी मागणी माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. अन्यथा शेतीत मोठ्या समस्या निर्माण होतील, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
राज्यात गेल्या दीड महिन्यांपासून अतिवृष्टीमुळे शेतीसह जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी शेतकऱ्यांना तातडीच्या आणि कायमस्वरुपी मदती करावी अशी मागणी केली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेचा लाभ घेऊन राज्य सरकारने अमंलबजावणी करावी. वेगाने पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई करण्याची गरज आहे. या आपत्तीत पिके, गुरेढोरे यांचे नुकसान झालेच आहे. तसेच जमीनही वाहून गेली आहे. पीक वाहून गेल्यास त्या वर्षाचे नुकसान होईल. मात्र, जमीन वाहून गेल्यास शेतकऱ्यांचा उत्पादन मिळण्याचा मार्ग कायमचा थांबतो. त्यामुळे केवळ पंचनामे करून मदत देऊन भागणार नाही. पिकांच्या नुकसानीपोटी मदत करावीच लागेल पण जमीन वाहून गेली म्हणूनही मदत करावी लागणार आहे. गुरेढोरे वाहून गेली आहेत. याबाबत मदत न केल्यास शेतीत मोठ्या समस्या निर्माण होतील. याकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. मदतीचे काम वेगाने करावे लागणार आहे.”
शेतकऱ्यांना विश्वासात घ्या
पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेण्याची गरज असल्याचे सांगून पवार यांनी पंचनामे प्रत्यक्ष शेतीवर जाऊन करायला हवेत अशी मागणीही केली. वासत्व पंचनामे केल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीची आणि कायमस्वरुपी मदत देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. काही मंत्री प्रत्यक्ष शेतांवर जाऊन पाहणी करत आहेत. ही चांगली बाब असून शेतकरी राजा कसा उभा राहील, याकडे आता अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तरच बळीराजा वाचेल, त्यातून मोठे संकट टळेल, असेही ते म्हणाले.
जे सांगतिले ते घडतेय
यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे हवामान विभागाने जे सांगितले ते घडत आहे. यंदा मे महिन्यातच मोठा पाऊस झाला. दरवर्षी असा पोऊस होत नाही. मेपासून सुरू झालेला पाऊस अजुनही सुरूच आहे. हवामान विभागाने शेतकऱ्यांना सावध केले आहे. बेसावध ठेवले नाही. त्याच्या अंदाजाची माहिती त्याची नोंद राज्य सरकारने घ्यायला हवी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.