पुणे: महापालिका प्राथमिक विभागाकडील विद्यानिकेतन व क्रीडानिकेतन शाळेतील विद्यार्थी वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेच्या शाळांसाठीच्या स्कूल बसमध्ये आता महिला मदतनीस नेमल्या जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेच्या पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकात तरतूद केली जाणार आहे.
शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्या विद्यानिकेतन व क्रीडानिकेतन शाळेतील विद्यार्थी वाहतुकीसाठी पुणे परिवहन महामंडळ पीएमपी यांच्याकडून बस पुरविण्यात येतात. नवीन शासन धोरणांनुसार विद्यार्थी वाहतूक बसमध्ये मुली असतील तर महिला सुरक्षा मदतनीस नेमणे अनिवार्य आहे. यानुसार परिवहन महामंडळाने बसमध्ये सुरक्षा मदतनीस पुरविण्याबाबत शिक्षण विभागाकडे मागणी केलेली होती. एकूण ४८ बसद्वारे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यात येते. ही बाब विचारात घेऊन विद्यार्थी वाहतूक बसमध्ये महिला सुरक्षा मदतनीस यांची नेमणूक करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत हे मदतनीस नेमले जाणार आहेत. राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये स्कूलबस चालकांकडून मुली तसेच लहान मुलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून विद्यार्थी बस वाहतुकीचे नवीन शासन धोरण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, या मदतनीस नेमल्या जाणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे उपायुक्त आशा राऊत यांनी दिली.