Lonavala Update: लोणावळ्याला जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; पर्यटकांना 'या' वेळेनंतर भुशी डॅमवर जाण्यास बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 16:10 IST2022-07-13T16:10:00+5:302022-07-13T16:10:21+5:30
लोणावळा शहरांमधील पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण केंद्र असलेले भुशी डॅम ओव्हरफ्लो

Lonavala Update: लोणावळ्याला जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; पर्यटकांना 'या' वेळेनंतर भुशी डॅमवर जाण्यास बंदी
पुणे : लोणावळा शहरांमधील पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण केंद्र असलेले भुशी डॅम काही दिवसांपूर्वी ओव्हरफ्लो झाले होते. धरण ओव्हरफ्लो झाल्याचे कळताच स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी भुशी धरणावर वर्षाविहारासाठी गर्दी केली होती. त्यानंतर पुण्यात पावसाचा जोर आणखी वाढल्याने सर्व धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. त्यातच भुशी डॅमच्या पायऱ्यांवरून प्रचंड वेगाने पाणी वाहू लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळी सायंकाळी पाच नंतर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
भुशी धरण हे लोणावळ्यातील पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण आहे. लाखो पर्यटक दरवर्षी याठिकाणी भेट देत वर्षाविहाराचा आनंद लुटतात. मागील वर्षीच्या तुलनेने यावर्षी धरण भरण्यास विलंब लागला होता. मात्र दोन चार दिवसांच्या संततधार पावसाने धरण भरून वाहू लागले आहे. मागील शनिवार - रविवारपासून याठिकाणी मोठी गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. दररोज नागरिक लोणावळ्याला जाण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसू लागले आहे. पण भुशी डॅमच्या पायऱ्यांवरील पाण्याचा वेग पाहता लोणावळ्यातील पर्यटनस्थळी सायंकाळी पाच नंतर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक कोंडी आणि दुर्घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे लोणावळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांनी सांगितलं. वर्षा विहाराच्या निमित्ताने हजारो पर्यटक भुशी धरण, लायन्स पॉईंट आणि टायगर पॉईंट इथे दाखल होतात. नुकतंच मुंबईतील एका पर्यटकाचा भुशी धरणात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळं पोलिसांनी अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रवेश बंदीचा निर्णय घेतला आहे.