मार्गासनी :
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगडाचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याकडे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केले असल्याचे चित्र पुढे आले आहे.
छत्रपती शिवरायांच्या प्रखर राष्ट्रीय बाण्याचा ज्वलंत वारसा जिवंत व्हावा यासाठी खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे यांच्यासह सर्वपक्षीय नेते, वेल्हे तालुक्यातील बहुतांश गावच्या ग्रामसभेने विनंत्या, मागण्या करूनही वेल्हे तालुक्याचे नामांतरण राजगड तालुका करण्याकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याबाबत निर्णय घेऊन वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड तालुका असे जाहीर करावे, असे साकडे मावळा जवान संघटनेचे अध्यक्ष व इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे ,बाळासाहेब सणस आदीं मावळ्यांनी घातले आहे.
राजगड तालुका असे नामांतर करण्यास तालुक्यातील बहुतांश गावांचा पाठिंबा आहे, असे असताना
वेल्हे तालुक्याचे नामांतर करण्याची कार्यवाही गेल्या वर्षभरापासून रखडलेली आहे. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी व स्वराज्याचा पहिला तालुका राजगडाकडे दुर्लक्ष झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील राजगड हा पहिला तालुका आहे.
राजगड हा स्वतंत्र राष्ट्राचा पहिला तालुका असल्याचे ऐतिहासिक कागदपत्रांवरून पुढे आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विश्ववंदनीय कार्याच्या स्मृतींना उजाळा देऊन प्रखर राष्ट्रीय बाण्याचा जागर व्हावा, यासाठी वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड करण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आली. यासाठी स्थानिक मावळा जवान संघटनेच्या वतीने गावोगाव अभियान राबविण्यात आले.
ग्रामसभेचे ठराव वेल्हे तालुका तहसीलदार शिवाजी शिंदे यांना देण्यात आले. त्यांनी प्रशासकीय बाबींची पूर्तता करत ठरावासह मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला. त्यानंतर राज्य शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आला.
खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे यांनीही तालुक्याचे नामांतर राजगड तालुका करण्याची मागणी शासनाकडे केली आहे.
इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे म्हणाले की,
शिवकाळापासून स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत तालुका राजगड असा उल्लेख असलेल्या नोंदी व शिक्के यांचे दुर्मीळ दस्त
आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून राजगड तालुक्याचा उल्लेख आहे. शिवरायांनी स्वराज्याचा राज्यकारभार किल्ले राजगडावरून १६४८ ते १६७२ पर्यंत पंचवीस वर्षे पाहिला. शिवरायांनी परकीयांची शेकडो वर्षांची गुलामगिरी नष्ट केली. लोककल्याणकारी राज्य स्थापन करून त्याचा राज्यकारभार राजगडावरून पाहिला. लोककल्याणकारी कार्यासाठी स्थिर प्रशासन यंत्रणा उभी केली. त्यासाठी गाव, कसबा, परगणे, प्रांत, तालुका, विभाग, सुभा अशी रचना केली. स्वराज्याचा कारभार चोखपणे व्हावा यासाठी खेड्यापाड्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी तालुक्याची निर्मिती केली.
- स्वराज्यातील पहिला तालुका राजगड असल्याचे ऐतिहासिक दस्तऐवज व शिक्का.