आद्यक्र क्रांतिकारकाची उपेक्षा !

By Admin | Updated: November 10, 2014 05:07 IST2014-11-10T05:07:48+5:302014-11-10T05:07:48+5:30

देशाच्या स्वातंत्र्यासाठी तारुण्याची होळी करून बलिवेदीवर चढलेल्या राष्ट्रपुरुषांच्या बलिदानाचा समाजाला नेहमीच विसर पडत आलेला आहे

Ignore the revolutionary revolutionary! | आद्यक्र क्रांतिकारकाची उपेक्षा !

आद्यक्र क्रांतिकारकाची उपेक्षा !

लक्ष्मण मोरे, पुणे
देशाच्या स्वातंत्र्यासाठी तारुण्याची होळी करून बलिवेदीवर चढलेल्या राष्ट्रपुरुषांच्या बलिदानाचा समाजाला नेहमीच विसर पडत आलेला आहे. इंग्रजांविरुद्ध धनगर, कोळी, रामोशी समाजातील तरुणांना घेऊन सशस्त्र लढा उभारणाऱ्या आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेंचे स्मारक पुण्यात कोठे आहे, याचे उत्तर कदाचितच कोणाला माहिती असेल. संगम पुलाजवळील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयाच्या आवारात असलेले हे स्मारक सध्या धूळमातीच्या आणि झाडाझुडपांच्या विळख्यात अडकले आहे. मद्यपींचा अड्डा बनलेल्या या स्मारकाच्या माथीही काळकोठडीचीच शिक्षा आलेली पहायला मिळत आहे.
संगम पुलाजवळ सीआयडीचे कार्यालय आहे. या ठिकाणी ब्रिटिश काळामध्ये सत्र न्यायालय होते. फडकेंनी इंग्रजांविरुद्ध बंडाचे निशान फडकावल्यानंतर इंग्रजांनी त्यांना विजापूरनजीक अटक करून १८७९ साली पुण्यात आणले होते. त्यांच्यावर याच सत्र न्यायालयामध्ये खटला चालवण्यात आला. खटला सुरू असताना सार्वजनिक काका फडकेंचे वकीलपत्र घेण्यासाठी धैर्याने पुढे आले. महादेव चिमाजी आपटेंनी न्यायालयात फडकेंची बाजू बेडरपणे मांडली. त्यांचे सहायक वकील म्हणून चिंतामण पांडुरंग लाटे यांनी न्यायालयात फडकेंचा बचाव
केला. खटला सुरु असताना
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यावर इंग्रजांनी फडकेंच्या बंडात सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला होता.
खटला सुरु असताना फडकेंना तेथीलच एका खोलीमध्ये डांबण्यात आलेले होते. १७ जुलै १८७९ ते ९ जानेवारी १८८० या कालावधीमध्ये फडके या खोलीमध्ये राहिले.
जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची रवानगी एडनच्या कारागृहात करण्यात आली होती. या संपूर्ण लढ्याची साक्षीदार असलेल्या या वास्तूमध्ये फडकेंचे एखादे स्मारक असावे, अशी कल्पना सीआयडीचे तत्कालीन महासंचालक जयंत उमराणीकर यांनी मांडली. त्यानुसार लोकवर्गणी आणि फडके स्नेहवर्धिनी संस्थेच्या अर्थसाहाय्यामधून २१ फेब्रुवारी २००६ रोजी एक देखणं स्मारक उभं राहिलं. येथे काम करणाऱ्या पोलिसांना प्रेरणा मिळावी, ही वास्तू एका क्रांतिकारकाच्या स्पर्शाने पावन झालेली आहे याची जाणीव कायम राहावी, याकरिता या स्मारकाची निर्मिती करण्यात आली होती. पोलिसांनाही या स्मारकाचा विसर पडलेला आहे.

Web Title: Ignore the revolutionary revolutionary!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.