एकत्र यायचेच असेल तर लवकर यावे; पुण्याच्या दोन्ही राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष निर्णयाच्या प्रतीक्षेत

By राजू इनामदार | Updated: May 9, 2025 15:47 IST2025-05-09T15:44:46+5:302025-05-09T15:47:03+5:30

शरद पवार किंवा अजित पवार हे अन्य कोणत्याही राजकीय नेत्यांपेक्षा वेगळे, दुरदृष्टी असलेले नेते असून ते एकत्र आल्याने महाराष्ट्राला दिशा मिळेल

If you want to come together come early Pune's two NCP city presidents await decision | एकत्र यायचेच असेल तर लवकर यावे; पुण्याच्या दोन्ही राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष निर्णयाच्या प्रतीक्षेत

एकत्र यायचेच असेल तर लवकर यावे; पुण्याच्या दोन्ही राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष निर्णयाच्या प्रतीक्षेत

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्याच पक्षातून फुटून आता राज्याच्या सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर एकत्र येण्याविषयी भाष्य केले. त्यावर दोन्ही पक्षाच्या शहराध्यक्षांनी, हा निर्णय नेत्यांनी घ्यायचा आहे, मात्र एकत्र यायचेच असेल तर लवकर यावे अशी भावना व्यक्त केली.

शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, आमचे सगळे राजकारण शरद पवार यांना समोर ठेवूनच सुरू असते. ते कोणत्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे एकत्रिकरणाचे वक्तव्य केले याची माहिती नाही, मात्र त्यांचे तसे अधिकृत लेखी निवेदन वगैरे काहीच नाही. अनौपचारिक चर्चेत त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे, तरीही आम्ही त्यांच्याबरोबरच आहोत. त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला तर तो आम्ही मान्य करूच, पण आता तरी तसे होईल असे वाटत नाही. याचे कारण सध्या तरी विरोधी पक्षाचे चेहरा म्हणून देशात तीनच व्यक्ती समोर येत असतात. राहुल गांधी, सुप्रिया सुळे व अखिलेश यादव. खासदार सुप्रिया सुळे या प्रगल्भ व्यक्तिमत्वाच्या राजकारणी आहेत. त्या उगीचच काहीही वक्तव्य करत नाहीत. शरद पवार यांनी एकत्रिकरणाचा निर्णय खासदार सुळे घेतील, मी त्या प्रक्रियेत नाही असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे खासदार सुळे या संदर्भात कोणती भूमिका घेतील हे महत्वाचे आहे. त्यांनी याविषयी अद्याप काहीही वक्तव्य केलेले नाही.” यासंबधी काही निर्णय घ्यायचा असेल तर तो लवकर व्हावा असे मत जगताप यांनी व्यक्त केले.

अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणाले, “यातून महाराष्ट्राला दिशा मिळेल, याचे कारण शरद पवार किंवा अजित पवार हे अन्य कोणत्याही राजकीय नेत्यांपेक्षा वेगळे, दुरदृष्टी असलेले नेते आहेत. वेगळे होण्याचे कारण स्वत: अजित पवार यांनीच वारंवार स्पष्ट केले आहे. विकासाची कामे करता यावीत, त्याला गती मिळावी याच कारणातून वेगळेपणे आले आहे. वेगळे असले तरी त्यांचे रक्ताचे नाते आहे. त्यामुळे ते एकत्र येतीलच. शरद पवार यांनी यासंबधीची निर्णय खासदार सुप्रिया सुळे घेतील असे सांगितले आहे. त्याप्रमाणे अजित पवार व त्यांच्यात चर्चा होईल व ते ठरवतील काय करायचे. आम्ही नेहमीच अजित पवार यांच्यासोबत आहोत व राहणार. त्यामुळे त्यांचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्यच असेल. एकत्र यावेत अशीच आमची भावना आहे, पण याचा निर्णय नेत्यांच्या स्तरावर होणार आहे. त्यामुळे यासंदर्भात आम्ही फक्त आमची भावना व्यक्त करू शकतो, निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. तो लवकर व्हावा असे मात्र आम्हाला वाटते.”

Web Title: If you want to come together come early Pune's two NCP city presidents await decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.