'आमची भूमी अपवित्र करण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी', शनिवारवाडा नमाज पठण प्रकरणात किन्नर समाजाचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 18:29 IST2025-10-24T17:53:45+5:302025-10-24T18:29:21+5:30
इथं जर कोण आलं चादर चढवायला तर आम्ही किन्नर त्या चादरीवर गोमूत्र, तीर्थजल टाकून निषेध व्यक्त करू

'आमची भूमी अपवित्र करण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी', शनिवारवाडा नमाज पठण प्रकरणात किन्नर समाजाचे आंदोलन
पुणे: पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा दावा केला जात आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली असून, विविध हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पतित पावन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवार वाड्यात आंदोलन केलं. संघटनेने सांगितलं की, त्यांनी त्या जागेवर गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र केली तसेच शेणाने सारवून जागा शुद्ध करण्याचा विधीही पार पाडला. यानंतर शनिवारवाड्यात ‘शिववंदना’ सादर करण्यात आली. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, अशा प्रकारच्या घटना भविष्यात सहन केल्या जाणार नाहीत.
तसेच खासदार मेधा कुलकर्णी यांनी 'यापुढे असे काही प्रकार आम्ही खपवून घेणार नाही' असे म्हणत प्रशासनाला अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच त्यांनी शनिवारवाड्यात असणाऱ्या कबरी बाहेर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह आंदोलन केले. त्यानंतर शनिवारवाडा नमाज पठण प्रकरणात अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याठिकाणी आता पोलिसर बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. या प्रकरणात किन्नर समाजानेही उडी घेतली आहे. शनिवारवाडा ही पवित्र भूमी कुणी अपवित्र करण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी आहे. असे म्हणत त्यांनी शनिवारवाड्याबाहेर आंदोलन केले. यावेळी त्यांनी गोमूत्र, तीर्थजल शिंपडून निषेध व्यक्त केला आहे.
किन्नर समाजाचा इशारा
इथं जर कोण आलं चादर चढवायला तर आम्ही किन्नर त्या चादरीवर गोमूत्र, तीर्थजल टाकून निषेध व्यक्त करू. इथं काही लोकांनी नमाज पडून ही आमची भूमी अपवित्र केली. म्हणून आम्ही विष्णू किन्नर आखाड्याची लोक ही भूमी पवित्र करतो. इथं जर आमच्या दोन गटांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याची गाठ किन्नर समाजासोबत असेल. असे म्हणत जय श्रीरामच्या घोषणा देत त्यांनी आंदोलन केले.