गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल सांगत २७ लाखांचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Updated: January 17, 2024 18:28 IST2024-01-17T18:28:27+5:302024-01-17T18:28:51+5:30
सुरुवातीला टास्क पूर्ण केल्याचा चांगला मोबदला देऊन विश्वास संपादन केला

गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल सांगत २७ लाखांचा गंडा
पुणे : गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल असे आमिष दाखवून एकाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. १६) गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत आंबेगाव खुर्द परिसरात राहणाऱ्या एका ४० वर्षीय व्यक्तीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. प्रवीण दगडु पाटील असे फिर्यादीत नाव आहे. फिर्यादीत म्हटल्यानुसार हा प्रकार ११ नोव्हेंबर २०२३ ते १६ जानेवारी २०२४ यादरम्यान घडला आहे. नम्रता नावाच्या महिलेने फिर्यदिंना व्हॉट्सॲपवर संपर्क साधला. पार्ट टाइम जॉब ‘वर्क फ्रॉम होम’ द्वारे चांगले पैसे कमावता येतील असा मेसेज केला. टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात मोबदला मिळेल असे सांगितले. त्यांनतर टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड करून वेगवेगळे टास्क दिले. सुरुवातीला टास्क पूर्ण केल्याचा चांगला मोबदला दिला आणि फिर्यादींचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादिंना वेगवेगळी कारणे सांगत पैशांची गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल असे सांगितले. तब्बल २७ लाख ४२ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. पैसे भरूनही परतावा न मिळाल्याने भारती पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिघावकर करत आहेत.