पुणे: ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याप्रकरणी महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ वर्षीय विवाहितेने समर्थ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली असून, या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.
तक्रारदार विवाहितेने सांगितले की, तिच्या ननंदेने तिला सातत्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. धर्म स्विकारण्यास नकार दिल्यानंतर तिला शिवीगाळ करण्यात आली तसेच शारीरिक मारहाणीचाही प्रकार घडला. इतकेच नाही, तर या प्रकरणात फ्रान्सिस नावाच्या व्यक्तीने देखील विवाहितेला धमकी दिली की, ’मी बाटलीतून आणलेले पाणी प्यायले नाहीस', जर तू धर्म स्वीकारला नाहीस तर तुझ्याविरुद्ध पोलिसात खोटी तक्रार दाखल केली जाईल.
तक्रारीनंतर समर्थ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७९, २९९, ३०२, ११५(२), १३१, ३५२, ३५१(२), ३(५) अंतर्गत ननंद व फ्रान्सिसच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत असून, या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. या प्रकारामुळे जबरदस्तीने धर्मांतराचे प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत."