Supriya Sule: नक्षलवाद संपला म्हणताय तर मग नव्याने कायदा कशासाठी? सुप्रिया सुळेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 17:22 IST2025-09-10T17:19:30+5:302025-09-10T17:22:02+5:30
जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून सरकार घटनाबाह्य काम करत आहे, ते खपवून घेतले जाणार नाही

Supriya Sule: नक्षलवाद संपला म्हणताय तर मग नव्याने कायदा कशासाठी? सुप्रिया सुळेंचा सवाल
पुणे : नक्षलवाद संपला असे केंद्र व राज्य सरकार म्हणत आहे, तरीही काही राहिलाच असेल तर त्यासाठी सध्या आहे ते कायदे पुरेसे आहेत, मग सरकार जनसुरक्षा विधेयक आणून ते नक्षलवाद संपवण्यासाठी आहे, असे सरकार जाहीरपणे कशासाठी सांगते आहे? अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून सरकार घटनाबाह्य काम करत आहे, ते खपवून घेतले जाणार नाही, असे त्या म्हणाल्या.
सरकारी दडपशाहीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ बुधवारी सकाळी निदर्शने करण्यात आली. खासदार सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पक्षाचे राज्य प्रवक्ते महेश तपासे, मनाली भिलारे, आरपीआयचे सचिन खरात, विशाल तांबे, मनाली भीलारे, शेखर धावडे, डॉ. निकिता गायकवाड, मंजिरी घाडगे, श्रद्धा जाधव, पायल चव्हाण, फईम शेख, युसुफ शेख, नरेश पगाडल्लू, वंदना मोडक, शैलेंद्र बेल्हेकर, सागर खांदवे व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
सुळे म्हणाल्या, ‘ज्यावेळी हे विधेयक आले, त्यावेळी आमच्यासह अन्य राजकीय पक्षांनाही त्याला विरोध केला. त्यासाठीच्या समितीत आम्ही होतो, त्यावेळी विधेयकात बऱ्याच दुरूस्त्याही सुचवल्या होत्या. मात्र विधेयकाचा अंतीम मसुदा तयार करताना त्याचा विचारच झाला नाही. जनसुरक्षा विधेयक घटनाविरोधी आहे असे आम्ही नाही तर अनेक अभ्यासक, तज्ज्ञ सांगतात. हे देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या राज्यघटनेनुसारच चालणार हे राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवे. आम्ही सरकारची ही दडपशाही खपवून घेणार नाही. त्याचा प्रतिकार करू.’ सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत निदर्शने करण्यात आली.