एकत्र यायचं असेल, तर अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावं लागेल; शरद पवारांच्या आमदाराचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 17:54 IST2026-01-19T17:53:15+5:302026-01-19T17:54:34+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुणे जिल्ह्यात महापालिका निवडणूक एकत्र लढले. आता जिल्हा परिषद निवडणुकीतही एकत्र लढण्याच्या हालचाली सुरू आहेत. दोन्ही पक्ष कायमचे एकत्र येण्याच्या चर्चा यामुळे सुरू झाल्या आहेत.

एकत्र यायचं असेल, तर अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावं लागेल; शरद पवारांच्या आमदाराचे विधान
पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) दोन्ही पक्ष एकत्र आले. त्याचा फारसा फायदा झाला नसल्याचे निकालातून समोर आले. पण, आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष कायमचे सोबत येणार का, या चर्चेने डोकं वर काढले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी एकत्र यायचं असेल, तर अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावं लागेल, असे विधान केले.
महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाची कामगिरी चांगली राहिली नाही. आता दोन्ही पक्ष जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. दोन्ही पक्ष ही निवडणूक एकत्र लढणार असल्याचे सांगितले जात आहेत. अजित पवार आणि शरद पवार कायमचे एकत्र येणार का, अशी चर्चाही या निमित्ताने सुरू झाली आहे. त्यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून भूमिका मांडण्यात आल्या.
उत्तमराव जानकर काय म्हणाले?
आमदार उत्तमराव जानकर यांनी याबद्दलची भूमिका मांडताना सांगितले की, "ते एकत्र येतील, मला वाटत नाही. कारण शरद पवारांचा विचार हा वेगळा आहे आणि अजित पवार सत्तेत आहेत. त्यामुळे असे होईल का असे मला वाटत नाही. कुठला तरी निर्णय अजित पवारांना तरी घ्यावा लागेल. म्हणजे सत्तेतून बाहेर तरी पडावं लागेल. नसेल, तर मग शरद पवारांच्या विचाराने पुढे जावं लागेल. धोरण असल्याशिवाय कोणताही पक्ष चालत नाही."
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते उमेश पाटील म्हणाले, "उत्तम जानकर हे बोलत असतात. त्यांच्या मनात असेल, तर काही राहत नाही. परंतू शेवटी पक्षाच्या पातळीवरचा निर्णय आहे. ते वरिष्ठ स्तरावर घेतले जातात. त्यांनी मत व्यक्त केले आहे. ते त्यांचे वैक्तिगत मत आहे."
"जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल. जिल्ह्यामध्ये, संपूर्ण ग्रामीण भागात आज राष्ट्रवादीचे चार आमदार आहेत. त्याचबरोबर इतर ठिकाणी ग्रामीण भागात राष्ट्रवादीची ताकद आहे", अशी भूमिका उमेश पाटील यांनी मांडली.