स्वतःच्या आई-बहिणींचा सन्मान करू शकत नाहीत ते इतरांचे काय करणार? मस्तानीच्या वंशजांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 14:17 IST2025-07-04T14:14:44+5:302025-07-04T14:17:07+5:30
बुधवार पेठेचं नाव ‘मस्तानी पेठ’ करा! असे म्हणणाऱ्या उद्धवसेनेला मस्तानी यांच्या वंशजांनी सुनावले

स्वतःच्या आई-बहिणींचा सन्मान करू शकत नाहीत ते इतरांचे काय करणार? मस्तानीच्या वंशजांचा संताप
पुणे: पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव दिलेच पाहिजे. जे लोक बुधवार पेठेचं नाव ‘मस्तानी पेठ’ करा! असे म्हणून टीका करीत आहेत. जे लोक स्वतःच्या आई-बहिणींचा सन्मान करू शकत नाहीत ते इतरांच्या काय करणार? भारतमाता ही देखील एका आईच्या रूपात दाखविली जाते; आई-बहिणींचा सन्मान न करणाऱ्यांची विकृत मानसिकता आहे, अशा शब्दांत राणी मस्तानी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या उद्धवसेनेला मस्तानी यांचे वंशज नवाब शदाब अली बहादूर पेशवा नवाब ऑफ बांदा यांनी सुनावले आहे.
राज्यसभेच्या मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनला ‘थोरले बाजीराव पेशवे’ यांचे नाव देण्याची मागणी केली. त्यावर सोशल मीडियावर मेधा कुलकर्णी यांना ट्रोल करण्यात आले. त्यांच्या मागणीला उत्तर म्हणून ‘कोथरूडच्या बाई, नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव ‘मस्तानी पेठ' करा!' अशा आशयाचे बॅनर शिवसेना (उबाठा) गटातर्फे लावण्यात आले होते. यावर नवाब शदाब अली बहादूर पेशवा नवाब ऑफ बांदा यांनी ‘लोकमत’शी बोलताना नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, बुधवार पेठेचं नाव ‘मस्तानी पेठ’ करावे अशी मागणी करणारी घाणेरडी मानसिकता उद्धवसेनेच्या लोकांची कशी असू शकते? मी अशा मानसिकतेच्या विरोधात आहे. पण मी मध्यप्रदेशात वास्तव्यास आहे. इथे ना मराठी लोक आणि ना उद्धवसेनेचे लोक आहेत. पुण्यात आलो असतो तर नक्कीच विरोध केला असता.
आज ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपट आल्यानंतर भारताच्या विविध भागातून खोटे वंशज पुढे यायला लागले आहेत. पुण्यातील पेशव्यांचे वंशज हे बाजीराव पेशवे यांच्या नावाने मंदिर, संग्रहालयातून पैसा कमवत आहेत. त्याचे खरे हक्कदार आम्ही आहोत. पण आम्हाला मंदिर, संग्रहालय याची कमाई नकोय. आम्ही त्यावर कधीही दावा केलेला नाही आणि करणार देखील नाही. हा धार्मिक मुद्दा आहे. पण ज्या गोष्टी घडत आहेत त्या चुकीच्या आहेत. आम्हाला त्यात पडायचे नाही. आम्ही पेशवे वंशज यांच्या विरोधात नाही. कुणीही पेशवा नाव लावावे. त्यांचा सन्मान करू नका असे आम्ही मुळीच म्हणणार नाही. आम्हाला एक हार घाला आणि त्यांना चार हार घाला. आमचे काहीच म्हणणे नाही. पण आमचा अपमान करू नका, असेही ते म्हणाले.