"मी दोषी आढळलो तर..."; वाल्मीक कराडने शेअर केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 06:40 IST2025-01-01T06:39:44+5:302025-01-01T06:40:21+5:30
कराड याने सीआयडीला शरण जाण्यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, ‘मी वाल्मीक कराड. केज पोलिस स्टेशनला माझ्याविरुद्ध खोटी खंडणीची केस दाखल झाली आहे...

"मी दोषी आढळलो तर..."; वाल्मीक कराडने शेअर केला व्हिडीओ
पुणे : केवळ राजकीय द्वेषापोटी माझे नाव या प्रकरणाशी जोडले जात आहे. मी जर यात दोषी आढळलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला तयार आहे, अशा आशयाचा वाल्मीक कराड याने शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
कराड याने सीआयडीला शरण जाण्यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, ‘मी वाल्मीक कराड. केज पोलिस स्टेशनला माझ्याविरुद्ध खोटी खंडणीची केस दाखल झाली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असतानाही मी पुण्याच्या सीआयडी पोलिसांसमोर शरण येत आहे. संतोष भैय्या देशमुख यांचे जे कुणी मारेकरी आहेत, त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी. केवळ राजकीय द्वेषापोटी माझे नाव या प्रकरणाशी जोडले जात आहे. मी जर यात दोषी आढळलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला तयार आहे.’
वाल्मीक कराड शरण येणार ही बातमी चॅनेलकडे असते; पण पोलिसांना कळत नाही, हे धक्कादायक आहे. त्याच्या मागे कोण आहे, ती ताकद शोधून काढली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी लेकी - सुनांना न्याय द्यावा.
-सुप्रिया सुळे, खासदार
पुरावे नष्ट केल्यावरच वाल्मीक कराडने शरणागती पत्करली आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केली पाहिजे आणि ही चौकशी बीडच्या बाहेर झाली पाहिजे .
-विजय वडेट्टीवार,
माजी विरोधी पक्षनेते
वाल्मीक कराड ताब्यात आला; पण ‘आका’ बाहेरच आहे. बीडमध्ये मागील पाच वर्षांत जे खून झाले त्या सगळ्याची चौकशी करा. मुख्यमंत्री ज्या कठोर पद्धतीने बोलले आहेत, त्याचप्रमाणे ते कारवाई करतील.
-जितेंद्र आव्हाड, नेते, शरद पवार गट