महायुती झाल्यास अनेक इच्छुकांची उमेदवारी टांगणीला ! नगरसेवक होण्याच्या आकाक्षेंवर सोडावे लागणार पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 11:26 IST2025-05-13T11:26:04+5:302025-05-13T11:26:57+5:30
महापालिका निवडणुकीसाठी युती झाल्यास अनेक इच्छुकांना उमेदवारी मिळणार

महायुती झाल्यास अनेक इच्छुकांची उमेदवारी टांगणीला ! नगरसेवक होण्याच्या आकाक्षेंवर सोडावे लागणार पाणी
पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेची निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे संभाव्य इच्छुकांनी पुन्हा कंबर कसली असून अनेक इच्छुक प्रभागात पुन्हा सक्रिय झाले आहेत.
मात्र, महायुतीमध्ये असलेल्या भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांची महापालिका निवडणुकीसाठी युती झाल्यास अनेक इच्छुकांना उमेदवारी मिळणार नाही. त्यामुळे अनेक इच्छुकांना नगरसेवक होण्याच्या आकांक्षेवर पाणी सोडावे लागणार आहे.
पुणे महापालिकेची आगामी निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहे. मात्र पुणे महापालिकेतून उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे वगळल्यामुळे प्रभाग रचना नव्याने करावी लागणार आहे. पुण्यात प्रभाग संख्या ४२ राहणार असून, नगरसेवकांची संख्या १६६ राहणार आहे. पुणे महापालिकेच्या २०१७च्या निवडणुकीत पुण्यात भाजपने एकहाती ९७ जागांवर विजय मिळविला होता. तर राष्ट्रवादीला ३९ आणि शिवसेनेला १० जागा मिळाल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसा, शासनाला आता चार महिन्यांत महापालिका निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.
या निवडणुकांसाठी महायुती होणार की नाही याबाबत भाजप तसेच राष्ट्रवादीकडून सावध भूमिका घेतली जात आहे. २०१७ च्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांमध्ये थेट स्पर्धा होती. त्यात, जवळपास १० प्रभागांमध्ये मध्ये ४० ठिकाणी या दोन्ही पक्षांचे नगरसेवक एकमेकांच्या विरोधात निवडून आले आहेत. त्यामुळे आता एकत्र निवडणूक लढवताना एकमेकांचे पारंपरिक मतदार, स्थानिक वजन आणि प्रभागांमधील कार्यकर्त्यांचे हित जपणे हे मोठे आव्हान ठरणार आहे.
कर्वेनगर, वानवडी, हडपसर, बाणेर, पाषाण, सहकारनगर या दोन्ही पक्षांचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढले होते. काही ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले, तर काही ठिकाणी राष्ट्रवादीचे. आता हेच प्रभाग जागावाटपाच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरणार आहेत. कारण त्या वेळी जिथे भाजप आणि राष्ट्रवादी दोघांचेही उमेदवार निवडून आले होते, तिथे या निवडणुकीसाठी उमेदवार कोणत्या जागेवर दावा करणार आहेत, हे अजून गुलदस्त्यात आहे. त्यामुळे यावर तोडगा काढताना दोन्ही पक्षांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
इच्छुकांचा स्वबळाच्या नाऱ्यावर भर
राज्यात भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना हे एकत्र सत्तेत असले तरी महापालिका निवडणुकांच्या युतीबाबत तीनही पक्षांकडून सावध भूमिका घेतली जात आहे. निवडणुकांबाबत केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुका महायुती म्हणून लढू, मात्र काही ठिकाणी वेगळी भूमिका घ्यावी लागेल असे सांगत स्वतंत्र लढण्याचेही सूतोवाच केले आहे. त्यामुळे महायुतीमधील तीनही पक्षांच्या इच्छुकांची पुण्यात घालमेल सुरू आहे. या तीन पक्षांतील सर्वच इच्छुक पुण्यात खासगीत स्वबळावर लढणेच फायद्याचे असल्याचे सांगत आहेत.