Railway: साठ वर्षांपूर्वीचे 'आयसीएफ'डबे प्रवाशांसाठी कर्दनकाळ; अपघात झाल्यास जीवितहानीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 14:58 IST2022-01-16T14:57:14+5:302022-01-16T14:58:14+5:30
पुण्यात जवळपास 15 गाड्यांना अजूनही आयसीएफ'डबे, अपघात झाल्यास जीवितहानी जास्त होणार

Railway: साठ वर्षांपूर्वीचे 'आयसीएफ'डबे प्रवाशांसाठी कर्दनकाळ; अपघात झाल्यास जीवितहानीची शक्यता
प्रसाद कानडे
पुणे : भारतीय रेल्वे बुलेट ट्रेनच्या दिशेने प्रवास करीत असली तरीही अजूनही बहुतांश रेल्वे गाड्यांना 60 वर्ष जून्या तंत्रज्ञानवर आधारित तयार केलेले ' आयसीएफ' दर्जाचे डबे वापरले जात आहे. ज्या ज्या वेळी आयसीएफ चे डबे असलेल्या रेल्वेचा अपघात झाला आहे. हे डबे नव्या 'एलएचबी' डब्यांच्या तुलनेत खूप मागास व अधिक धोकादायक ठरले आहे. रेल्वेने देखील हे मान्य केले आहे. ज्या वेळी 'आयसीएफ 'डबे जोडलेल्या रेल्वेचा अपघात झाला आहे.त्यावेळी मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे.
तीन दिवसापूर्वी बिकानेर -गोवाहाटी एक्सप्रेसचा अपघात झाला. 9 प्रवासी मृत्युमुखी पडले तर 35 हून अधिक प्रवासी जखमी झाले. या गाडीला देखील आयसीएफ चे डबे जोडण्यात आले होते. त्यामुळे जखमी व मृत्यू झालेल्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. जर इथे एलएचबी दर्जाचे डबे असते. तर कदाचित चित्र वेगळे असते.
स्वीझरलँडकडून 1955 साली घेतलेले तंत्रज्ञान
स्वातंत्र्यपूर्व काळात रेल्वे डबे लाकडाचे होते. स्वतंत्र नंतर मात्र रेल्वेने कूस बदलली. 1955 साली भारतीय रेल्वेने स्विझरलॅन्ड हुन आताच्या ' आयसीएफ' डब्याचे शेल आणले. त्यानंतर त्याचा आधार घेऊन चेन्नईच्या इन्ट्रीग्रल कोच फॅक्टरी 1962 साली पहिला डबा तयार झाला. त्यालाच आयसीएफ डबा असे नावं देण्यात आले. वेळोवेळी गरजेनुसार त्यात बदल होत गेले. मात्र ते खूप छोट्या स्तरावरचे होते. यातले मुख्य तंत्रज्ञान अजून ही 1962 सालचेच आहे. तीन वर्षांपूर्वी ह्या डब्यांचे उत्पादन बंद करण्यात आलं आहे. मात्र अजूनही देशातल्या 50 टक्के हुन अधिक गाड्यांना हेच डबे वापरले जात आहे.
पुण्यातून सुटणाऱ्या 15 गाड्यांना आयसीएफ चे डबे
पुणे रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या जवळपास 15 गाड्यांना अजूनही धोकादायक समजले जाणारे आयसीएफ चे डबे जोडले आहेत. यात पुणे - जम्मूतवी झेलम एक्सप्रेस, पुणे - पटना एक्सप्रेस, पुणे - हावडा एक्सप्रेस, डेक्कन क्वीन एक्सप्रेस,कोयना एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, पुणे - दरभंगा एक्सप्रेस, पुणे -वाराणसी, महाराष्ट्र एक्सप्रेस, पुणे - एरणाकुलम एक्सप्रेस, पुणे- वेरावल,जोधपूर, आदी गाड्यांचा समावेश आहे.
आयसीएफ डबे नुकसान दायक कसे
1. हे डब्यांचे वजन खूप असते,त्यामुळे याच्या गतीवर देखिल परिणाम होतो.
2. डबे एकमेकांना जोडण्यासाठी स्क्रु कपलिंग चा वापर होतो.त्यामुळे अपघात झाल्यावर डबे एकमेकांवर चढतात तसेच ते लांब पर्यत फेकले जातात. यातच जीवितहानी जास्त होते.
''आम्ही आयसीएफ डब्यांच्या बदल्यात नवे एलएचबी डबे जोडण्याचे काम करीत आहोत. आता पर्यंत अनेक गाड्यांना जोडून देखील झाले आहे. मात्र ह्याला आणखी किती वेळ लागेल हे निश्चितपणे सांगता येणार नाही असे राजीव जैन (अतिरिक्त महासंचालक, प्रसिद्धी विभाग, रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली) यांनी सांगितले.''
''रेल्वे बोर्डच्या आदेशानुसार तीन वर्षापासून ह्या डब्यांचे उत्पादन बंद झाले आहे. 1962 पासून हे डबे तयार केले जात आहे. गरजेनुसार त्यात वेळोवेळी काही प्रमाणात बदल झाला आहे असे जी व्यंकटेशन (जनसंपर्क अधिकारी, आयसीएफ, चेन्नई) यांनी सांगितले.''