TET Exam Scam| आयएएस अधिकारी सुशील खोडवेकरचा जामीन फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 10:26 IST2022-02-23T10:21:19+5:302022-02-23T10:26:05+5:30
सुशील खोडवेकर याला सायबर पोलिसांनी ठाणे येथून २९ जानेवारी रोजी अटक केली होती...

TET Exam Scam| आयएएस अधिकारी सुशील खोडवेकरचा जामीन फेटाळला
पुणे :शिक्षक पात्रता परीक्षेत (TET Exam fraud) गैरव्यवहार प्रकरणात शालेय शिक्षण विभागाचा तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर याचा जामीन न्यायालयाने फेटाळून लावला. तुकाराम सुपे याच्यावरील चौकशीची तीव्रता कमी करण्याच्या बदल्यात खोडवेकर याने सुपे याच्याकडून जी ए सॉफ्टवेअर कंपनीला काळ्या यादीतून बाहेर काढण्यास सांगितल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
सुशील खोडवेकर याला सायबर पोलिसांनी ठाणे येथून २९ जानेवारी रोजी अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार घाडगे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी खोडवेकर याच्या जामिनाला विरोध केला. त्यांनी न्यायालयात सांगितले की, हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. शिक्षणाच्या मंदिरात नैतिक मूल्यांची शिकवण दिली जाते. ते ठिकाण आरोपींनी प्रदूषित केले आहे. अतिशय शांत डोक्याने यातील आरोपी आश्विनकुमार, डॉ. प्रीतीश देशमुख, तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर यांनी संगनमताने हा गुन्हा केला आहे. सुशील खोडवेकर हा या सर्व आरोपींशी सातत्याने संपर्कात असल्याचे त्यांच्या फोन कॉलवरून निष्पन्न झाले आहे. आरोपींनी परीक्षार्थींकडून प्रत्येक तीन ते चार लाख रुपये घेऊन त्यांना पात्र ठरवून करोडो रुपयांचा गैरव्यवहार केला आहे.
सुपे याच्याविरोधातील विभागीय चौकशी खोडवेकर याच्याकडे होती. या चौकशीत शिथिल करून त्याबदल्यात जी ए सॉफ्टवेअर कंपनीला काळ्या यादीतून काढण्यासाठी खोडवेकर याने सुपे याच्यावर दबाव टाकला होता. त्यामुळे अध्यक्ष दत्तात्रय जगताप व इतरांचा विरोध असतानाही सुपे याने स्वत:चा अधिकार वापरून जी ए सॉफ्टवेअर कंपनीला काळ्या यादीतून काढले होते. खोडवेकर हा उच्च पदस्थ अधिकारी आहे. त्याला जामीन दिला तर तो आपल्या अधिकाराचा वापर करून पुराव्यात फेरफार करू शकतो. त्यामुळे खोडवेकर याचा जामीन अर्ज फेटाळावा, अशी विनंती न्यायालयाला केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस जे. डोलारे यांनी खोडवेकर याचा जामीन फेटाळून लावला.