राजीनामा देईन, पण कारवाई थांबणार नाही; ओव्हरहेड केबल्सच्या कारवाईवरून महापौर व स्थायी समिती अध्यक्षांमध्ये मतभेद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 13:22 IST2026-04-08T13:16:50+5:302026-04-08T13:22:34+5:30
मी सगळ्यांना विश्वासात घेऊन उत्पन्नवाढीसाठी ही कारवाईची मोहीम राबविली आहे, त्यामुळे ती आता थांबविता येणार नाही, असा आक्रमक पवित्रा भिमाले यांनी घेतला

राजीनामा देईन, पण कारवाई थांबणार नाही; ओव्हरहेड केबल्सच्या कारवाईवरून महापौर व स्थायी समिती अध्यक्षांमध्ये मतभेद
पुणे : शहरात सुरू असलेल्या ओव्हरहेड केबल्सवरील कारवाईवरून महापौर मंजूषा नागपुरे आणि स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्यामध्येच मतभेद निर्माण झाले आहेत. केबल्सवरील कारवाई थांबवण्याची भूमिका नागपुरे यांनी घेतल्याने संतापलेल्या भिमाले यांनी राजीनामा देईन, पण कारवाई थांबणार नाही, असा पवित्रा घेतला, शेवटी महापौरांनाच मवाळ भूमिका घ्यावी लागली. या निमित्ताने महापालिका पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे.
महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी स्थायी समिती अध्यक्ष भिमाले यांनी शहरातील बेकायदा ओव्हरहेड केबल्सवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिकेच्या विद्युत विभागाने १ एप्रिलपासून शहरातील ओव्हरहेड केबल्सवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व केबल व्यावसायिकांनी एकत्र येत सोमवारी महापौर नागपुरे यांची भेट घेतली.
यावेळी महापौरांनी आयुक्त नवल किशोर राम यांच्या उपस्थितीतच विद्युत विभागाच्या प्रमुख मनीषा शेकटकर यांना ओव्हरहेड केबलबाबत कोणतेही धोरण न करताच कारवाई कशी सुरू केली, अशी विचारणा केली. तसेच तुमच्या कारवाईमुळे नागरिक मला कॉल करून आमचे केबल कनेक्शन बंद झाल्याच्या तक्रारी करीत असल्याचे सांगितले. त्यावर शेकटकर यांनी स्थायी समिती अध्यक्षांच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू असल्याचे सांगितले. त्यावर महापौरांनी थेट स्थायी समिती अध्यक्षांना विचारणा केली. तसेच यासंबंधीचे धोरण होईपर्यंत कारवाई थांबवण्याची भूमिका घेतली. त्यावर भिमाले यांनी कारवाई थांबविण्यास नकार दिला. वेळप्रसंगी मी राजीनामा देईल. मी सगळ्यांना विश्वासात घेऊन उत्पन्नवाढीसाठी ही कारवाईची मोहीम राबविली आहे, त्यामुळे ती आता थांबविता येणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. अखेर महापौरांनी मात्र मवाळ भूमिका घ्यावी लागली. यानंतर नागपुरे आणि भिमाले यांनी केबल चालकांच्या शिष्टमंडळासमोर जात आम्ही छोट्या केबल वाहिन्यांच्या केबलवर कारवाई करणार नाही. मात्र, एका महिन्यात तुम्ही त्या कशा नियमित करणार यासंबंधीचा आराखडा सादर करा, असे निर्देश दिले.