Deenanath Mangeshkar Hospital: रुग्णालयाला मी कडक शब्दात समज देणार; रुपाली चाकणकरांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 12:12 IST2025-04-07T12:11:17+5:302025-04-07T12:12:51+5:30
नागरिकांना धर्मदायी संस्थांनी चांगल्या पद्धतीची आरोग्य सुविधा देणं हे अपेक्षित असताना रुग्णाला हे उपचार देण्यासाठी त्यांनी टाळाटाळ केली

Deenanath Mangeshkar Hospital: रुग्णालयाला मी कडक शब्दात समज देणार; रुपाली चाकणकरांचा इशारा
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर रुग्णांच्या जीवापेक्षा पैशांना प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. २९ मार्च रोजी झालेल्या या दुर्दैवी घटनेत तनिषा भिसे (वय २७) या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. त्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली होती. आज प्रत्यक्ष महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भिसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर भिसे कुटुंबियांच्या भेट घेतली आहे. आज याच प्रकरणातील अहवाल समिती राज्य महिला आयोगासमोर सादर करणार आहेत. हा अहवाल सादर होण्यापूर्वी चाकणकर भिसे परिवाराशी संवाद साधणार असल्याची माहिती समोर आली आहे. भेटीनंतर चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.
चाकणकर म्हणाल्या, आपण पाहतोय गेले काही दिवसापूर्वी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जी घटना घडली त्याचे पडसाद हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटताना दिसत आहेत. खरंतर आरोग्य सुविधा हे अतिशय मूलभूत अशी गरज आहे. आणि नागरिकांना धर्मदायी संस्थांनी चांगल्या पद्धतीची आरोग्य सुविधा देणं हे अपेक्षित आहे. आणि तशी नियमावली असताना रुग्णाला हे उपचार देण्यासाठी त्यांनी टाळाटाळ केली. त्याच्यासाठी मागितलेली डिपॉझिटची रक्कम आणि एकंदरीत या सगळ्या घटनेमुळे यामध्ये रुग्णाचा मृत्यू झालाय. खरंतर प्रत्येक एक स्वप्न असतं आणि एक मातृत्व मिळत असताना आपल्या मुलांसोबत आपलं आयुष्य असावं. यामुळे आईचंच नाहीतर कुटुंबाचं स्वप्न भंग पावले.
कडक शब्दात समज देणार
आज मी या कुटुंबीयांची भेट घेतली त्यांच्याकडून सविस्तर झालेला अनुभव हा खरंतर त्यांनी माझ्याकडे लेखी स्वरूपात दिलेला आहे. याच्यामध्ये बऱ्याच वेळा रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये झालेल्या चर्चा, झालेले उपचार आणि जे काही रिपोर्ट हे गोपनीय असतात. पण यामध्ये हॉस्पिटलने स्वतःला वाचवण्यासाठी जो अहवाल सादर केला आहे. आज रुग्णाच्या गोपनीय गोष्टी जाहीर केलेल्या आहेत ते अत्यंत चुकीचं आहे. आणि या घटना या गोष्टी हॉस्पिटलने खरंतर समितीसमोर मांडायला पाहिजे होतं. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले. रुग्णालयाला मी कडक शब्दात समज देणार आहे.