'लाडकी बहीण योजना सुरू करताना माझी चेष्टा झाली मात्र...' - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 21:07 IST2025-01-10T21:07:05+5:302025-01-10T21:07:52+5:30
माझी राजकीयदृष्ट्या चेष्टा करण्यात आली होती. मात्र, ही योजना

'लाडकी बहीण योजना सुरू करताना माझी चेष्टा झाली मात्र...' - अजित पवार
दौंड : लाडकी बहीण योजना सुरू करताना माझी राजकीयदृष्ट्या चेष्टा करण्यात आली होती. मात्र, ही योजना सुरळीत सुरू असून भविष्यात कुठल्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौंड येथे दिली.
दौंड सोसायटीच्या उद्घाटनप्रसंगी अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, पोलिसांनी आदरयुक्त दबदबा निर्माण केला पाहिजे. महिलांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्या नराधमांना सात जन्म आठवले, अशी कारवाई झाली पाहिजे. बीड येथील प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतलेली आहे. या प्रकरणात कोण जवळचा आणि कोण बाहेरचा असे न करता आरोप सिद्ध झाल्यास संबंधितावर कडक कारवाई करून कुणालाही माफी मिळणार नाही. या प्रकरणाची चौकशी न्यायालयीन आणि सीआयडीमार्फत सुरू आहे.
राज्यात न भूतो न भविष्य असे यश महायुतीला मिळाले आहे. पाच वर्षे स्थिर सरकार राहणार असल्याने आमच्या सरकारला कुठलाही धक्का पोहोचणार नाही. विकासाची कामे जलद गतीने करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी स्वतः आम्ही तिघांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठ बांधलेली आहे. भविष्यात शेतकऱ्यांना राज्यात सोलारमार्फत वीज दिली जाणार आहे. महाराष्ट्राचा विकास करीत असताना कुणीही राजकारण करू नये किंबहुना राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित येऊन विकासाला हातभार लावला पाहिजे, असे शेवटी अजित पवार म्हणाले.