"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 21:51 IST2025-10-31T21:49:52+5:302025-10-31T21:51:10+5:30
Rupali Thombare Patil: पुण्यातील माधवी खंडाळकर प्रकरणावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच घमासान सुरू झाले आहे. रुपाली ठोंबर पाटील यांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन ठिय्या दिला.

"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
Rupali Thombare News: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रुपाली विरुद्ध रुपाली हा संघर्ष आणखी चिघळला आहे. माधवी खंडाळकर यांनी मारहाण केल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी रुपाली ठोंबरे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाने रुपाली ठोंबरे पाटील चांगल्याच संतापल्या. खडक पोलीस ठाण्यात जाऊन रुपाली ठोंबरेंनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देते असे विधान करत मला अटक करा अशी मागणीही त्यांनी पोलिसांना केली.
पुण्यातील माधवी खंडाळकर या महिलेने रक्तबंबाळ अवस्थेत एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यांनी थेट रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. रुपाली ठोंबरे पाटील यांनी गुंड पाठवून मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला.
माधवी खंडाळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात रुपाली ठोंबरे पाटील यांच्या बहिणीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी थेट पोलीस ठाणे गाठत संताप व्यक्त केला.
रुपाली ठोंबरे रुपाली चाकणकरांवर भडकल्या
या प्रकरणानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी रुपाली चाकणकरांना लक्ष्य केले. रुपाली चाकणकर यांनी राजकीय बदल घेण्यासाठी माधवी खंडाळकर यांना एक व्हिडीओ करायला लावला. रुपाली चाकणकर याच महिलांना धमक्या देतात, असा आरोप रुपाली ठोंबरे यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देते -रुपाली ठोंबरे
रुपाली ठोंबरे पाटील यांनी खडक पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांची भेट घेतली. त्यांच्या कार्यालयात जमिनीवर बसत रुपाली ठोंबरे पाटील यांनी जाब विचारला.
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते. पुढच्या एक मिनिटात ट्विट करून राजीनामा देते. राजीनामा दिल्यानंतर आणि सरकार कसं काम करत आहे, हे सगळ्यांसमोर आणणार आहे. महिला आयोगाप्रमाणेच पोलीस देखील काम करायला लागले आहेत", असा संताप रुपाली ठोंबरे पाटील यांनी व्यक्त केला.